नवी दिल्ली – अग्निपथ योजनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लष्कराच्या तिन्ही सेना प्रमुखांची स्वतंत्र बैठक घेतली. या बैठकीत अग्निपथ योजनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेठी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी उपस्थित होते.
सर्वप्रथम नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले. नौदल प्रमुखांसोबतची बैठक संपल्यानंतर हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी भेट घेतली आणि शेवटी पंतप्रधानांनी लष्करप्रमुख जन मनोज पांडे यांची भेट घेतली. सेवाज्येष्ठतेनुसार एकापाठोपाठ एक बैठका झाल्या.
ऍडमिरल आर हरी कुमार हे तिन्ही लष्करप्रमुखांमध्ये सर्वात ज्येष्ठ आहेत. जनरल पांडे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पंतप्रधान मोदींनी तिन्ही लष्करप्रमुखांची 30 मिनिटे स्वतंत्रपणे भेट घेतली.