चीनी घुसखोरीबाबत खोटे बोलणाऱ्या मोदींकडून शहिदांचा अपमान – राहुल गांधी

बेरोजगारीचे प्रचंड वादळ येणार असल्याचा इशारा

पाटणा -कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरूवारी पुन्हा चीनी कुरापतींवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. भारतीय हद्दीत चीनने घुसखोरी केलीच नाही असे खोटे बोलून मोदींनी शहीद जवानांचा अपमान केला, असे ते म्हणाले.

बिहार विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून राहुल यांनी बिहारमधील कॉंग्रेस कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केले. भारतीय भूमीचा काही भाग चीनने बळकावल्याचे ऐकूून माझे रक्त खवळले.

मात्र, चीनी घुसखोरीचा मोदींनी इन्कार केला. मोदी खोटे बोलत असल्याचे संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या विसंगत निवेदनातून उघड झाले. बिहार रेजिमेंटच्या बलिदानाची पर्वा मोदींना नाही का? त्या रेजिमेंटचे 20 जवान चीनी सैनिकांबरोबर झालेल्या संघर्षात शहीद झाले, याकडे राहुल यांनी लक्ष वेधले.

देशाला करोना त्सुनामी धडकणार असल्याचा इशारा मी फेब्रुवारीतच दिला होता. आता करोनाचा विश्‍वगुरू बनण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे, असे म्हणत त्यांनी देशातील करोना संकटाची तीव्रता वाढल्याचे सूचित केले. देशात यापुढे बेरोजगारीचे आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेचे प्रचंड वादळ येणार आहे. त्यासाठी मोदी सरकार जबाबदार असेल, असा आरोप राहुल यांनी केला.

बिहारमधील निवडणुकीत कॉंग्रेस समविचारी पक्षांशी हातमिळवणी करेल. पुढील सरकार आमच्या आघाडीचे असेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.