विदर्भातील शेतकऱ्यांना मोदींनी वाऱ्यावर सोडले- धनंजय मुंडे

सत्तांतर झाल्यानंतर दोन प्रमुख दाढीवाले जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत 

नागपूर: ज्या विदर्भाने भाजपला भरभरून दिले त्याच विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना भाजपाने वाऱ्यावर सोडले आहे. मोदी यांनी शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट भाव देण्याचे आश्वासन दिले होते, धानाला उत्पादन खर्चा इतका तरी भाव मिळाला का? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. भंडारा-गोंदिया मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे विदर्भ दौऱ्यावर आहेत.

मुंडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की आदरणीय शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही. देशाच्या पंतप्रधानांना इतके खोटे बोलणे शोभत नाही, कर्जमाफी कुणी दिली? आयात करणारा देश निर्यात करणारा कसा झाला? पवार साहेबांच्या घरावर टीका करणाऱ्यांनी हे ध्यानात असू द्या.

देशाचे पंतप्रधान विकासावर बोलत नाहीत , यांची भाषा आकसाची आहे. याला जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू असे काही बरळत असतात. सत्तांतर होऊ द्या या देशातील दोन प्रमुख दाढीवाले जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. मोदीजी जनता तुमचीच घरी जाण्याची वाट पाहत आहे, असा टोला मुंडेंनी मोदींना लगावला.

देशभरातील शेतकऱ्यांप्रमाणे इथल्या विदर्भातील धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचीही या सरकारने फसवणूक केली. परिणामी पोटनिवडणुकीत शेतकऱ्यांनी भाजपला धडा शिकवला. भाजपविरोधातील रोष दिसून आला. मेरा देश बदल रहा है याची ही प्रचिती आहे. परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत ते कायम ठेवायचे आहे, असेही मुंडे म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.