मोदींनी खोटे बोलून केसाने गळा कापला – राज ठाकरे

नांदेड – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत गुढीपाडव्या महूर्तावर घेतलेल्या सभेनंतर आज त्यांची पहिली सभा नांदेड मध्ये होत आहे. ठाकरे यांनी मुंबईतील सभेत मोदी सरकारची पुराव्यानिशी केलेली पोलखोल हा सर्वत्र चर्चेचा विषय बनला होता. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते, मात्र मुंबईतील सभेत मोदी विरोधी भूमिका घेत राज ठाकरे यांनी आगामी काळात राज्यात सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते.

नांदेड मधील सभेला सुरुवात होताच राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर चौफेर टीका केली आहे. लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचा निर्णय हा जाणीवपूर्वक घेतल्याचे सांगत, फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर राग असल्यानेच संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेत असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

नरेंद्र मोदी यांच्यावर तुफान टीका करत राज ठाकरे यांनी, २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी खोटी स्वप्ने दाखवली असल्याचे सांगितले. मागील पाच वर्षांमध्ये मोदी हे नुसते भाषणातच बोलले असून ते सतत इलेक्शन मोडवर असल्याची टीका राज ठाकरेंनी केली.

आजच्या अहमदनगर येथील नरेंद्र मोदींच्या सभेबाबत भाष्य करताना राज ठाकरे यांनी, आमचे पंतप्रधान काळ्या रंगाला घाबरत असल्याचे सांगितले. ज्याप्रमाणे या सभेपूर्वी काळ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली, काळे कपडे घातलेल्या व्यक्तींना सभेत प्रवेश नाकारण्यात आला होता, याचा अर्थ नरेंद्र मोदी हे आता घाबरले असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना नरेंद्र मोदी हे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांबद्दल काही बोलत नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून, महाराष्ट्रात १४००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी करत हेच का अच्छे दिन ? हेच स्वप्न दाखवले होते का २०१४ मध्ये? असा प्रश्न विचारला. महाराष्ट्रातील राज्य सरकारवर जाहीर टीका करत, देवेंद्र फडणवीस म्हणतात एक लाख वीस हजार विहिरी बांधल्या, तर कुठे आहेत त्या विहिरी ? असा प्रतिप्रश्न राज ठाकरे यांनी केला.

जनतेने एवढे बहुमत दिले आणि त्याबदल्यात सद्य सरकार हे नुसते खोटे बोलत असल्याचे सांगत, मोदी हे मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया या विषयांवर थोडेदेखील बोलत नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. तसेच केंद्र सरकारने हजारो कोटी रुपयांच्या नुसत्या खोट्या जाहिराती केल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

नोटबंदीच्या विषयावर बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर घणाघात केला आहे. नोटबंदीचे पुढे काय झाले? असे विचारत मोदी आता यावर बोलायला तयार नाहीत, नोटबंदीमुळे पाच कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

एयर स्ट्राईकचा उल्लेख करत पुरावा मागितला तर यात चुकीचे असे काय? असा सवाल ठाकरे यांनी यावेळी पुन्हा उपस्थित केला. आम्हाला सैन्यावर पूर्ण विश्वास असल्याचे सांगत, राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. वायू सेनेचे अधिकारी हवाई हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मेले हे सांगू शकत नाहीत, मात्र त्याचवेळी अमित शहा कसे काय २५० ते ३०० दहशतवादी मेले असल्याचे जाहीर करतात यावर राज ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. सद्याचे सरकार हे जवानांवर राजनीती करत असल्याचा घणाघात करत, राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी हे जवानांच्या नावावर कसे काय मत मागत आहेत? असे यावेळी विचारले. यावर जोरदार प्रहार करताना राज ठाकरेंनी निवडणुकीला काय विंग कमांडर अभिनंदन उभे आहेत काय? असा सवाल देखील यावेळी राज ठाकरे यांनी विचारला.

नरेंद्र मोदी हे सध्या नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यावर टीका करत असून, सध्याच्या निवडणुकीशी याचा काहीही संबंध नसल्याचे सांगत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी हे नको ते विषय उकरून काढत असल्याचे ते म्हणाले. सध्याच्या परिस्थिती मध्ये तरुणांना रोजगार नाही. अशातच बाहेरच्या राज्यातील लोक येऊन येथील तरुणांचे रोजगार हिसकावून घेत असल्याचे चित्र महाराष्ट्रात दिसत असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र यावर काहीच बोलत नसल्याचा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला.

नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमावर निशाणा साधताना राज ठाकरे यांनी ही कल्पना मुळातच हिटलरची असल्याचे सांगितले. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे देशाला हुकूमशाहीकडे नेत असल्याचे सांगत, तुम्हाला गुलाम बनून राहायचे आहे का? असे राज ठाकरे म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.