राफेल गैरव्यवहाराला मोदी थेट जबाबदार ; राहुल गांधी यांची पुन्हा टीका

वृत्तपत्रातील बातमीचा दिला हवाला ; संरक्षण खात्याच्या सचिवांची सूचना डावलून परस्पर केला व्यवहार

नवी दिल्ली: राफेल व्यवहार प्रकरणात संरक्षण मंत्रालयाच्या एका सचिवाने पंतप्रधान कार्यालयाला केलेली सुचना डावलून पंतप्रधान कार्यालयाने फ्रांसशी राफेल विमान खरेदीच्या व्यवहाराची बोलणी केली अशी बातमी एका वृत्तापत्रात प्रसिद्ध झाल्याने राफेल प्रकरणाला पुन्हा एकदा हवा मिळाली आहे.तो धागा पकडून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. या प्रकरणात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत असा आरोप त्यांनी केला.

आपले मेव्हणे रॉबर्ट वढेरा, माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्यासह अन्य संबंधीतांवर सरकार कायदेशीर कारवाईचा बडगा उचलत असताना त्यांनी आता या प्रकरणाचा खुलासा केला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणात आम्ही जे आरोप केले होते ते आरोप आता अगदी स्पष्ट झाले असून मोदींनी फ्रांसशी राफेल खरेदी प्रकरणात समांतर चर्चा करून देशाच्या हवाईदलाच्या 30 हजार कोटी रूपयांची चोरी केली आहे असा थेट आरोपही त्यांनी केला. हा करारच रद्द करावा अन्यथा त्याची जेपीसी अंतर्गत चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली.

चौकीदारही चोर है या घोषणेचाही त्यांनी यावेळी पुनरूच्चार केला. सदर बातमी एका राष्ट्रीय दैनिकात आज प्रकाशित झाली आहे. त्यात संरक्षण मंत्रालयाच्या सचिवांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहुन राफेल प्रकरणात पंतप्रधान कार्यालयाने परस्पर समांतर चर्चा करू नये अन्यथा त्याचा या व्यवहारावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि सरकारला नुकसान सोसावे लागू शकते असा स्पष्ट अभिप्राय दिला होता. तरीही त्याकडे दुर्लक्ष करून स्वत: मोदींनी फ्रांसशी यावर चर्चा केली असे या बातमीत म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.