मोदी हे हिटलर प्रमाणे वागत आहेत – राज ठाकरे

मुंबई – मुंबईतील आपल्या गुढीपाडव्याच्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर तुफान टीका केली आहे. मराठी नव वर्षाच्या शुभेच्छा देत, मोदी मुक्त भारत व्हावा अशी इच्छा व्यक्त करत राज ठाकरे यांनी येत्या काही दिवसात ८ ते १० सभा घेणार असल्याचे सांगितले. याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला झाला तरी चालेल, असे राज ठाकरे म्हणाले.

मोदी सरकार हे पूर्वीच्या काँग्रेस सरकारच्याच योजना अमलात आणत असून, या योजनांची नावे फक्त बदलली असल्याचा आरोप राज यांनी केला आहे. काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या मध्ये कोणताही फरक नसल्याचे राज ठाकरे म्हणाले.

निवडणूक जिंकण्यासाठी सद्य सरकार हे युद्धजन्य परिस्थिती निर्माण करत असल्याची टीका राज ठाकरेंनी केली असून देशाच्या सीमा या बंदिस्त असून देखील देशात RDX येतेच कसे? असा प्रश्न उपस्थित केला. देशाचे सैनिक हे खडतर परिस्थिती मध्ये काम करत असताना, सद्याचे सरकार हे जवानांवर राजनीती करत असल्याचा घणाघात राज ठाकरे यांनी केला आहे.

एयर स्ट्राईकचा उल्लेख करत राज ठाकरे यांनी जर पाकिस्तानमध्ये २५०-३०० दहशतवादी मारले गेले असते, तर पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना परत पुन्हा पाठ्वलेच नसते असे म्हंटले आहे. एयर स्ट्राईकचा पुरावा मागितला तर यात चुकीचे असे काय? असा सवाल देखील ठाकरेंनी उपस्थित केला.

पंतप्रधान हे २०१४ पूर्वी अच्छे दिन येणार असल्याचे सांगत होते, मात्र ते आता बेरोजगारी, विकास याबद्दल चकार शब्दही काढत नाहीत. नोटबंदीचे पुढे काय झाले? याचे उत्तर नरेंद्र मोदी देत नाहीत, असे राज ठाकरे म्हणाले. मोदी आणि अमित शहा ही जोडगोळी देशासाठी घातक असल्याचे सांगत, मोदी हे पुन्हा निवडून आले तर देशातील निवडणुका बंद करतील असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. नोटबंदीच्या आधी भारतीय जनता पक्षाने देशभरात जमिनी घेऊन ठेवल्या आणि दिल्लीत तर १ लाख ७० हजार स्क्वेअर फुटांचं ऑफिस बांधले. त्यामुळे एवढे आलिशान सेवन स्टार ऑफिस बांधायला पैसे कुठनं आले? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे. नोटबंदीनंतर देशात लोकांच्या नोकऱ्या गेल्या. ९९.३ टक्के पैसे बँकेत परत आले. याचा अर्थ नोटबंदी ही अपयशी ठरली असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

पंतप्रधान फक्त खोटं बोलतात. कोणत्याही प्रश्नांची उत्तरे मोदी देत नाहीत, भाजपचे नेते देखील यावर बोलत नाहीत. त्यांचे अंधभक्त देखील कोणतेही उत्तर देत नाहीत, पण एकच प्रश्न विचारतात ‘मोदींना पर्याय काय?  २०१४ मध्ये नरेंद्र मोदींना संधी दिली, तर त्यांनी देश खड्ड्यात घातला आहे. आता राहुल गांधींना संधी देऊन तर बघूया? खड्ड्यात घालतील किंवा देशाचं चांगले देखील करून दाखवतील. पण संधी देण्यात हरकत काय? असे राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे येत्या निवडणुकीत या सरकारला कोणत्याही परिस्थिती मध्ये पायउतार करावे असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.