साताऱ्यात धडाडणार मोदींची तोफ

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आज काय बोलणार, सर्व स्तरात उत्सुकता

सातारा  – राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात भाजपने भक्कम शिरकाव केल्याचे चित्र दिसत असताना विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजपने आपले हुकमी नरेंद्र मोदी अस्त्र साताऱ्याच्या मैदानात आणले आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्या दि. 17 रोजी साताऱ्यात होणाऱ्या सभेकडे पश्‍चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मोदी काय बोलणार आणि कोणावर टीका करणार, याबाबतची उत्सुुकता ताणली आहे.

सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोमात असून स्थानिक पातळीवरील आरोप- प्रत्यारोपांची जुगलबंदी सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असणाऱ्या सातारा जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत केलेल्या मेहनतीचे फळ मिळविण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. वाई, सातारा, कराड दक्षिण, माण व फलटण या मतदारसंघांत भाजपचे उमेदवार पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले आहेत. पाटण, कराड उत्तर, कोरेगाव आणि माण या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार लढत देत आहेत.

यापैकी माणमध्ये भाजप व शिवसेनेचे उमेदवार एकमेकांविरूद्ध ठाकले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाच वर्षांत नियोजनबद्ध पद्धतीने पक्षसंघटन मजबूत केले. निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही कॉंग्रेसमधील मातब्बरांना पक्षात सामावून घेतले. उदयनराजे भोसले यांनीही खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये एन्ट्री घेतली. त्यामुळेच पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्‍वभूमीवर अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान मोदी यांची सभा घेऊन आपल्या वाढविलेल्या ताकदीवर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी सातारा जिल्ह्याचे वेगळे नाते आहे. त्यामुळेच या पक्षाचे जिल्ह्यात मोठे वर्चस्व राहिले. श्री. मोदी यांनी श्री. पवार यांच्यावर यापूर्वीही टीका केली आहे. मात्र, पवार यांच्या खास मैदानात येऊन मोदी काही बोलणार का, याबाबतची उत्सुकता मोठी आहे. त्याचप्रमाणे पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढविण्यासाठी ते काय मुद्दे मांडणार, याकडेही लक्ष आहे. निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय गणिते बांधली जातीलच. पण स्थानिक प्रश्‍नांसह जिल्ह्याच्या विकासासाठी पंतप्रधान म्हणून ते काही वेगळ्या घोषणा करणार का, याचीही उत्सुकता आहे.

पिशव्या अन्‌ पाण्याची बाटली ‘नॉट अलाऊड’
लोकसभा पोटनिवडणूक व आठ विधानसभा मतदारसंघातील भाजप व शिवसेनेच्या प्रचारासाठी साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुरक्षेच्या कडक बंदोबस्तात होणार आहे.

मान्यवरांची सुरक्षा वर्गवारी लक्षात घेऊन सभेसाठी येणाऱ्या प्रेक्षकांनी कोणत्याही प्रकारच्या वस्तू, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, साहित्य, पिशव्या अगर जिवितास अपाय होईल अशा वस्तू, उपकरणे सोबत आणू नयेत, असे आवाहन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे. अशा वस्तू सोबत आणल्यास संबंधितांना सभेच्या ठिकाणी प्रवेश नाकारला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)