शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम मोदी सरकारचे

अजित पवार : वाई येथील कार्यक्रमात प्रतिपादन 

वाई – मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यापासून देशातील आर्थिक घडी ढासळली असून बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. शेअर मार्केट, बॅंका अडचणीत आल्या आहेत. पक्षनिष्ठा उरली नाही. सत्तेच्या लालसेपोटी व चौकशीचा ससेमिरा चुकविण्यासाठी पक्षांतराला ऊत आला आहे. आमदारांचा घोडेबाजार सुरू आहे. शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. दररोज शेतकरी आत्महत्या करीत आहेत. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. सरकार मात्र निवडणुकीच्या तोंडावर जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांनी केली. वाईतील एमआयडीसीत शेलारवाडी रस्त्यावर सुरु करण्यात आलेलेल्या स्वाद दूध प्रकल्पाच्या उद्‌घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. मकरंद पाटील होते.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंडळ सोलापूरचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार, राष्ट्रवादी मिडीया सेलचे राज्याचे प्रमुख सारंग पाटील, प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चिटणीस प्रतापराव पवार, सूतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, जिल्हा परिषदेचे कृषी समितीचे सभापती मनोज पवार, जिल्हा बॅंकेचे संचालक दत्तानाना ढमाळ, नितीन पाटील, पंचायत समितीच्या सभापती सौ. रजनी भोसले, खंडाळा पंचायत समितीचे सभापती मकरंद मोटे, वाईचे उपसभापती अनिल जगताप, लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे, लोणंदचे नगराध्यक्ष सचिन शेळके, महाबळेश्‍वरचे उपनगराध्यक्ष अफजल पठाण, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस- अशोकराव सरकाळे, किरण पवार, प्रदीप चोरगे, रविंद्र चोरगे, प्रमोद चोरगे, संदीप आमले, प्रफुल्ल चोरगे, ओंकार चोरगे, सौ. कांचन चोरगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पवार पुढे म्हणाले, ही परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही विचार केला पाहिजे. सातारा जिल्हा कायमच यशवंतराव चव्हाण, लक्ष्मणराव पाटील, मदन पिसाळ यांच्या विचारावर चालला आहे याचा आनंद आहे. पवार साहेब कृषीमंत्री असताना त्यांनी शेतकरी हिताच्या व दूध उत्पादन वाढीसाठी अनेक चांगल्या योजना राबविल्या. दूध व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचा स्वाद हा प्रकल्प प्रदीप चोरगे व सहकाऱ्यांनी सुरू करून या परिसरातील शेतकर्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखविला आहे. स्वादच्या उत्पादनाला पाचगणी, महाबळेश्‍वरसारखी बाजारपेठ उपलब्ध आहे. अवघ्या दोनशे रुपयांवर नोकरी करणाऱ्या प्रदीप चोरगे यांनी अनेक संकंटांचा सामना करत आपली व कुटुंबाची प्रगती साधली ही गोष्ट कौतुकास्पद आहे.

आ. मकरंद पाटील म्हणाले, सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीही जिद्द, चिकाटी व सातत्यपूर्ण प्रयत्नाने यश मिळवू शकते हे प्रदीप चोरगे यांनी सिध्द केले आहे. गरवारे कंपनीचे सर्वात मोठे वेंडर म्हणून त्यांनी लौकिक मिळविला असून आज स्वादच्या रुपाने एका नव्या व्यवसायात धाडसी पाऊल उचलले आहे. दूध व दुधाचे सर्व उपपदार्थ निर्मिती येथे केली जात आहे. स्वाद लवकरच बाजारपेठेत स्वतःचा ब्रॅंड निर्माण करेल, असा विश्‍वास व्यक्त करून पाटील म्हणाले, प्रदीपदादांच्या रुपाने पक्षाला एक चांगला कार्यकर्ता मिळाला आहे. वाई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी सत्तेत असताना 1 हजार कोटीहून अधिक रुपयांची जी विकासकामे झाली व जी विकासकामे आजही सुरू आहेत त्याचे सर्व श्रेय अजितदादांचे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही विकासाची घोडदौड अशीच सुरू राहिल.

यावेळी नगरसेवक व प्रकल्प प्रमुख प्रदीप चोरगे यांनी प्रास्ताविकात प्रकल्पाची जडणघडण व प्रकल्पातील उत्पादने यांबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रकल्पाचे कार्यकारी संचालक सुनिल अहिवळे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी अजित पवार यांच्या हस्ते प्रदीप चोरगे यांच्या मातोश्री विमल चोरगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर वाई पंचायत समितीच्यावतीने पवार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गायत्री गाडे या मुलीने काढलेली स्वाद डेअरीच्या पेंटींगचे विमोचन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पवार यांच्या हस्ते लेक वाचवा-लेक वाढवा या योजने अंतर्गत मुलींना जन्म दिलेल्या माता कांचन वाडकर, जयश्री शिंदे, सिमा ओंबळे, मानसी फाटक, समीना शेख, वनीता चव्हाण यांना पाच हजार रुपयांच्या ठेवीच्या पावत्या सुपूर्द करण्यात आल्या.

विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. रविंद्र चोरगे यांनी आभार मानले. कार्यक्रमास दिलीप पिसाळ, शिवाजीराव पिसाळ, प्रमोद शिंदे, महादेव मसकर, सौ. रंजना डगळे, दिलीप बाबर, शशिकांत पवार, शंकरराव शिंदे, भूषण गायकवाड, विक्रांत डोंगरे, मधुकर भोसले, सौ. सुनिता कांबळे, शिवाजीराव जमदाडे, यशवंत जमदाडे, मनीष भंडारे, महेंद्र पुजारी, आनंद चिरगुटे, प्रसाद देशमुख, राजेंद्र तांबेकर, अजित शिंदे, अशोक सरकाळे आदींसह दुग्ध उत्पादक शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.