मोदी सरकारकडे युवकांना रोजगार देण्याची क्षमता नाही – राहुल गांधी

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे रोजगार दो अभियान

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न उपस्थित करीत मोदी सरकारला त्या विषयावरून घेरले आहे. या संबंधात त्यांनी बेरोजगारीच्या विरोधात मोदी सरकारच्या विरोधात रोजगार दो अभियान सुरू केले आहे.

ट्‌विटरवर जारी केलेल्या एका व्हिडीओ संदेशात त्यांनी म्हटले आहे की, देशात दर वर्षी किमान दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्‍वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारकडे आज युवकांना रोजगार देण्याची क्षमता नाही. त्यांनी देशात अशी चुकीची आर्थिक धोरणे राबवली की त्यातून लोकांच्या आहेत त्याही नोकऱ्या गेल्या आहेत.

मोदी सरकारमुळे देशातील चौदा कोटी लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत असा दावाही त्यांनी केला आहे. या गंभीर समस्येकडे डोळे झाक करून गाढ झोपी गेलेल्या या सरकारला जागे करण्याची गरज आहे असेही त्यांनी म्हटले आहे.रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांनी आणि ज्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत अशा लोकांनी सरकारला जागे करणारे आंदोलन सुरू केले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

त्यांनी म्हटले आहे की मोदींनी लोकांना रोजगाराची स्वप्न विकून केंद्रातील सत्ता मिळवली पण ते लोकांना रोजगार देऊ शकले नाहीत. देशात आज बेरोजगारीची जी भीषण समस्या निर्माण झाली आहे त्याचे मुख्य कारण नोटबंदी, चुकीची जीएसटी आणि देशात चुकीच्या पद्धतीने लागू करण्यात आलेले लॉकडाऊन हे आहे. त्यामुळे देशाची संपुर्ण आर्थिक चौकटच उद्धवस्त झाली असून आज देश युवकांना रोजगारच देऊ शकत नाही अशी सध्याची स्थिती आहे.

सेंटर फॉर मॉनिटरींग इकॉनामि या संस्थेन आपल्या अहवालात नमूद केले आहे की लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर एका एप्रिल महिन्यात देशातील तब्बल 12 कोटी लोक बेरोजगार झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.