“करोना काळात मोदी सरकारकडून भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांसोबत भेदभाव”

नवी दिल्ली – देशातील करोना परिस्थिती हाताबाहेर जात आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बैठक बोलवून करोना स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर सोनिया गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर कडाडून टीका केली. तसेच भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांसोबत मोदी सरकार करोना काळात भेदभाव करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

विविध राज्यातील काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या सहयोगी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनेकदा पत्र लिहून आवश्यक साधनसामुग्री मागितली आहे. मात्र, केंद्र सरकारने मौन धारण केलं आहे. अनेक राज्यांमध्ये व्हॅक्सिन नाहीत, व्हेंटिलेटर नाही, ऑक्सिजन नाही. गैर भाजपशासित राज्यांना मदत दिली जात नाही, मात्र भाजपची सत्ता असलेल्या राज्यांना प्राधान्याने मदत केली जात आहे, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

दरम्यान रेमडेसिवीर रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाची असताना रेमडेसिवीर आणि मेडिकल ऑक्सिजनवर 12 टक्के जीएसटी का वसूल केला जात आहे? ऑक्सिमीटर आणि व्हेंटिलेटरवरही 20 टक्के जीएसटी का वसूल केली जात आहे ? असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच आपल्याच देशात हजारो लोक व्हॅक्सीन मिळत नसल्याने मरत आहेत. मात्र दुसऱ्या देशांना मदत करून आपण किती उदार आहोत, हे दाखवण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचा दावाही सोनिया गांधी यांनी केला. यावेळी त्यांनी २५ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची मागणी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.