पंढरपूर – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामधे जोरदार आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक सभेत शरद पवार यांच्यावर सतत हल्ला चढवला होता. त्यानंतर शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर देत, या वयात असं वागणं बरं नव्हे असे म्हंटले आहे.
माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवार संजय शिंदे यांच्या सांगोला तालुक्यातील सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या टीकेचा समाचार घेत शरद पवार यांनी मोदी हे सारखे महाराष्ट्रात येत असून विकास कामांवर बोलण्यापेक्षा माझ्यावर आणि माझ्या घरातील विषयांवरच जास्त बोलत असल्याचे ते म्हणाले. हे फकीर असल्याचे म्हणत यांना घर म्हणजे काय हे कळणार नाही असा टोला देखील शरद पवार यांनी यावेळी लगावला.