मुंबई:पॉलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवर तानाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्फिंग करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी चेहरा लावण्यात आला. तर तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यांवर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवत भाजपवर टीका केली आहे. तसेच खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करत या व्हिडीओबाबत नाराजी व्यक्त करत, दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी भक्तांकडून ‘पॉलिटिकल किडा’ या ट्विटर हॅंडलवरून तान्हाजी सिनेमाच्या प्रोमोचा मॉर्फ केलेला एक व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर गृहमंत्री अमित शाह यांचा चेहरा लावण्याचा खोडसाळपणा करण्यात आलाय. या व्हीडिओद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान मोदींची तुलना करून महाराजांचा पुन्हा एकदा अपमान करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.
‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकानंतर पुनश्च हा प्रकार घडलाय. मोदी भक्तांकडून महाराजांचा असा वारंवार अवमान होत असतानाही पंतप्रधान मोदी आणि भाजपा नेते मूग गिळून गप्प का? पंतप्रधान नरेंद्र मोदी वा अमित शाहांकडून या कृत्याविषयी एक चकार शब्दही काढण्यात आलेला नाही. या प्रकारावर ट्विटवरून प्रचंड नाराजी देखील व्यक्त करण्यात येत आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ तात्ळाळ डिलीट करावा आणि माफी मागावी, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तरीही याबाबत कार्यवाही होत नसल्यास भाजपाद्वारे याचे समर्थनच केले जात असल्याचे जनतेने समजावे का?, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या व्हिडिओबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ही चित्रफित मी संभाजी भिडेंपासून भाजपच्या सगळ्या नेत्यंना पाठवल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या विरोधात सातारा, सांगली बंद करणारे या व्हिड़िओवर काय प्रतिक्रिया देतात ते पाहायला हवे.
दरम्यान, भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहेत. पॉलिटिकल कीडा या कुठल्याशा ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट झालेल्या व्हीडिओचा भाजपाशी कुठलाही संबंध नाही. तो भाजपाचा अधिकृत व्हीडिओ नाही. तो कुठेही प्रचारात वापरलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी कुणाचीही तुलना करण्याचे भाजपा कधीही समर्थन करणार नाही”असे अधिकृत स्पष्टीकरण भाजपने दिले आहे.
“पुस्तक झालं आता व्हिडीओ आला. अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय. संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी. आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. सरकारची जबाबदारी आहे, आमच्या भावनांची कदर करत अश्या गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी”,
-खासदार संभाजीराजे छत्रपती