छत्रपती शिवरायांशी मोदींची तुलना कधीच होऊ शकत नाही – छगन भुजबळ

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करणाऱ्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाबाबत महाराष्ट्र विकास आघाडीचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा. छगन भुजबळ यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. छत्रपती शिवरायांशी मोदींची तुलना कधीच होऊ शकत नाही, अशा शब्दात भाजपावर त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे.

यापूर्वी देखील कधी प्रभू रामचंद्र तर कधी “हर हर मोदी घर घर मोदी” असं म्हणत शिवशंभूंशी मोदींची तुलना करण्याचा प्रयत्न झाला. आतापर्यंत लोकांनी हे सहन केले. पण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर तुलना केल्यानंतर भाजपाच्या या कृत्यावर संताप व्यक्त होणे, स्वाभाविक आहे. छत्रपती शिवाजी महाराज कुठे आणि मोदी कुठे? छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केले. तसेच मुघलांच्या अन्यायाविरोधात तलवारी उपसल्या, त्यांना विविध खात्यांमध्ये काम करण्यासाठी मुस्लिम बांधवाची साथ होती. हा इतिहास पाहता आजची मोदींची कार्यपद्धत आणि त्यांनी घेतलेले विविध निर्णय हे विशिष्ट धर्माच्या विरोधात आहेत, हे स्पष्ट दिसतेय. त्यामुळे कुणीही छत्रपती शिवाजी महाराजांशी त्यांची तुलना करू नये, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.