मोदींनी भारताच्या आत्म्यावरच हल्ला केला; राहुल गांधींचा आरोप

नवी दिल्ली – पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या फोनवर पेगॅसस या क्षेपणास्त्रा सारख्या संवेदनशील हत्याराचा वापर करून उद्योगपती, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि अन्य महत्वाच्या घटकांवर हल्ला केला आहे. मोदींनी हा भारताच्या आत्म्यावरच केलेला हल्ला आहे असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आज विरोधी पक्षांच्या नेत्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला.

आज संपुर्ण विरोधी पक्ष एकत्रितपणे येथे उपस्थित आहे. आमच्या सर्वांचा संसदेतील आवाजच दाबून टाकण्याचा सतत प्रयत्न सुरू आहे. आमचा फक्त एकच प्रश्‍न आहे. इस्त्रायलकडून हे हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर भारत सरकारने विकत घेतले आहे काय आणि जर घेतले असेल तर त्याचा वापर कोणाच्या विरोधात केला गेला आहे एवढीच माहिती आम्हाला हवी आहे.

पण ती माहिती सुद्धा सरकार देत नाही, त्यावर ते चर्चाही करायला तयार नाहीत असे राहुल गांधी यांनी यावेळी नमूद केले. मोदींनी जर देशातील अनेकांच्या फोनवर हा हल्ला केला असेल तर त्यावर चर्चा करायला नको का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी यावेळी सांगितले की, राष्ट्रीय सुरक्षा, शेतकऱ्यांचे प्रश्‍न आणि लोकशाही रक्षणाच्या विषयावर आज सगळे विरोधी पक्ष एकत्र आहेत. पेगॅसस प्रकरणात राष्ट्रपतींनीच सरकारला संसेदत चर्चा करण्याचा आदेश द्यावा अशी मागणी करणारे पत्र सात राजकीय पक्षांनी राष्ट्रपतींना दिले आहे.

तसेच पत्रकारांच्या संघटनांनी या प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता चांगलेच पेटले असल्याचे चित्र सध्या राजधानीत दिसून येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.