मोदी आणि जिनपिंग यांच्यातील चर्चा विशेष फलदायी

बिश्‍केक : शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीनिमित्ताने द्विपक्षीय चर्चा

बिश्‍केक- पंतप्रधान नरेंद्र मोदी अणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात आज द्विपक्षीय संबंधांबाबत व्यापक चर्चा झाली. शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी किरगीझीस्तानची राजधानी बिश्‍केक इथे दाखल झाले आहेत. या दरम्यान मोदी आणि जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. ही चर्चा विशेष फलदायी झाली असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. या चर्चेदरम्यान मोदी आणि जिनपिंग यांनी आर्थिक आणि सांस्कृतिक संबंधांमध्ये प्रगती करण्याच्या हेतूने एकत्रपणे काम करण्याची तयारी दर्शवली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत मिळून मोदी यांची पंतप्रधानपदी फेरनिवड झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट आहे. मोदी आणि जिनपिंग गेल्या 5 वर्षात 10 पेक्षा अधिक वेळा भेटले आहेत.

संयुक्‍त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या 1267 अल कायदा निर्बंध समितीने पाकिस्तानस्थित जैश ए मोहंम्मदचा म्होरक्‍या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित केले गेल्यानंतर महिन्याभराने ही भेट होत आहे. मसूदला दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत टाकण्यावरची तांत्रिक स्थगिती चीनने उठवल्यावर याबाबतची घोषणा झाली होती.निवडणुकीतील विजयाबद्दल जिनपिंग यांनी मोदी यांचे अभिनंदन केले. त्याबद्दल मोदींनी आभारही मानले आणि जिनपिंग यांना 15 जून रोजी येणाऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.

डोकलाम येथील 73 दिवसांच्या कोंडीमुळे निर्माण झालेला तणाव वुहान येथील परिषदेनंतर दोन्ही देशांनी लष्करी संबंधांसह अन्य क्षेत्रातील संबंध सुधारण्यावर भर दिला होता. वुहान येथील बैठकीमध्ये दोन्ही देशांमधील संबंधांना स्थैर्य आणि उंची मिळाली होती. दोन्ही देशांमधील संरक्षण संवादामध्ये वेगाने प्रगती होते आहे. एकमेकांच्या संवेदनशील मुद्दयांची आणि हेतूंची दखल घेतली जात आहे. तेंव्हापासून सहकार्यासाठी नवीन क्षेत्र उपलब्ध होत आहेत, असे मोदी यांनी जिनपिंग यांना सांगितले.

अमेरिकेने चीनवर मोठे व्यापारी निर्बंध आणले आहेत. तर भारताला दिलेला व्यापारी प्राधान्यतेचा दर्जाही काढून घेतला आहे. त्या पार्श्‍वभुमीवर व्यापाराबाबत अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या एकांगी धोरणाविरोधात सामुहिक आघाडी उभी करण्यावर जिनपिंग यांनी भर दिला. भारत आणि चीन दरम्यान 95 अब्ज डॉलरची व्यापारी उलाढाल झाली असून यावर्षी ही उलाढाल 100 अब्ज डॉलरचा टप्पा ओलंडेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)