न्यूयॉर्क –टाईम या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाने बुधवारी जगातील 100 सर्वांत प्रभावशाली व्यक्तींची वार्षिक यादी जाहीर केली. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबरोबरच पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांना स्थान मिळाले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, त्या देशाच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस, चीनचे अध्यक्ष शी जीनपिंग, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वांत प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश आहे. एशियन पॅसिफिक पॉलिसी अँड प्लॅनिंग काऊन्सिलच्या कार्यकारी संचालिका मंजुषा पी.कुलकर्णी यांनाही त्या यादीत स्थान देण्यात आले आहे. भारताला स्वातंत्र्यानंतर तीन प्रभावी नेते लाभले.
त्यामध्ये पं.जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि मोदींचा समावेश आहे. देशाच्या राजकारणावर मोदींचा पगडा आहे, असे टाईमकडून नमूद करण्यात आले आहे. मोदींचा गौरव करतानाच टाईमने त्यांच्यावर निशाणाही साधला आहे. मोदींनी देशाला धर्मनिरपेक्षतेपासून दूर नेऊन हिंदू राष्ट्रवादाच्या दिशेने चालवले आहे. ते मुस्लिम अल्पसंख्याकांचे हक्क घटवत आहेत. तसेच, पत्रकारांना धाकदपटशा दाखवत आहेत, अशी टीकाटिप्पणी टाईमकडून करण्यात आली आहे.
ममता या भारतीय राजकारणातील आक्रमकतेचा चेहरा बनल्या आहेत. ममता म्हणजेच तृणमूल कॉंग्रेस आहेत. झुंजारपणा हे त्यांचे वेगळेपण आहे, असे टाईमने म्हटले आहे. त्या नियतकालिकाने पूनावाला यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. करोना संकट अद्याप संपलेले नाही. ते संपवण्यासाठी पूनावाला हातभार लावू शकतात, असे त्यांच्याविषयी नमूद करण्यात आले आहे.