आंतरराष्ट्रीय समुदायाने दहशतवादाविरोधात एकवटावे-मोदी

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पाकिस्तानवर अप्रत्यक्ष निशाणा
भारत जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध देणारा देश

संयुक्त राष्ट्रे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत दमदार भाषण करताना दहशतवादाच्या मुद्‌द्‌यावरून पाकिस्तानवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्यांनी दहशतवादाविरोधात एकवटण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय समुदायाला केले.

मोदींनी त्यांच्या भाषणात विविध मुद्‌द्‌यांवरून भारताची समर्थ बाजू भक्कमपणे मांडली. दहशतवादाविरोधात एकोपा नसल्यावरून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दहशतवाद हे कुठल्या एका देशापुढील नव्हे; तर संपूर्ण जगासमोरील मोठ्या आव्हानांपैकी एक आहे. मात्र, दहशतवादाच्या मुद्‌द्‌यावर एकवाक्‍यता नसल्याची बाब संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेचा आधार असणाऱ्या तत्वांनाच धक्का पोहचवते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. गौतम बुद्ध, स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधींचा उल्लेख करून त्यांनी भारताने जगाला शांततेचा संदेश दिल्याचे नमूद केले. भारत हा जगाला युद्ध नव्हे; तर बुद्ध देणारा देश आहे, असा समर्पक उल्लेख त्यांनी केला. जगाला सतर्क करण्यासाठी दहशतवादाच्या विरोधातील आमचा आवाज गांभीर्याने घुमतो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

हवामान बदलाच्या विरोधात लढा देणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आम्ही झटत आहोत. भारताला प्लास्टिकमुक्त देश बनवण्यासाठी आम्ही व्यापक मोहीम हाती घेणार आहोत, अशी माहितीही मोदी यांनी त्यांच्या भाषणात दिली. जनतेच्या कल्याणातून जगाचे कल्याण असे भारताचे धोरण आहे. आम्ही स्वच्छ भारत अभियान, आयुषमान भारत, आधार, जनधन योजना असे अनेक कल्याणकारी कार्यक्रम राबवत आहोत. विकासाची आस असणाऱ्या देशांना आमच्या त्या अनुभवाचा लाभ होऊ शकतो, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. महत्वाच्या जागतिक व्यासपीठावर मोदींनी हिंदीतून भाषण केले. त्यांचे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील हे दुसरे भाषण ठरले. त्यांनी पंतप्रधान म्हणून 2014 मध्ये पहिले भाषण केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.