अयोध्या – अयोध्या राममंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची तारीख निश्चित करण्यात आली असून करोना व्हायसरमुळे लांबणीवर पडलेल्या या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. या कार्यक्रमासाठी 50 हून अधिक व्हीआयपी हजर असणार आहेत, अशी माहिती राम मंदिर ट्रस्टने दिली आहे.
राममंदिर ट्रस्टकडून सांगण्यात आले की, देशात सध्या करोनाचा संसर्ग असल्याने सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून भूमिपूजन करण्यात येईल. यासाठी संपूर्ण अयोध्येत सीसीटीव्ही स्क्रीन लावण्यात येणार आहेत, जेणेकरून भक्तांना कार्यक्रम लाइव्ह पाहता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. पण त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.
राममंदिर उभारणीत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या सर्व भाजप नेत्यांना निमंत्रण दिले जाणार आहे. या यादीत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार यांचा समावेश असणार आहे. तसेच सरसंघचालक मोहन भागवतदेखील कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत.
न्यासाचे सदस्य कामेश्वर चोपाल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गर्भगृहापासून मंदिराच्या कळसाची उंची पूर्वी 128 फूट इतकी होती, ती वाढवण्यात आली आहे. आता कळसाची उंची 161 फूट इतकी असणार आहे. यात मंदिराच्या भिंती 6 फुटांच्या दगडांनी बांधण्यात येणार आहे. तर दरवाजा संगमरवरी दगडाने बनवण्यात येणार आहे. मंदिराच्या पूर्वीच्या रचनेत तीन कळस होते. मात्र सुधारित प्रस्तावात आता 5 कळस असणार आहेत. तर मंदिराला पाच प्रवेशद्वार असणार आहेत.
दरम्यान, अनेक दशकांपासून देशाच्या राजकारणात गाजलेल्या अयोध्येतील वादावर 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. वादग्रस्त जागेवर राम मंदिराचे निर्माण करण्यात यावे, तर मशिदीसाठी अयोध्येत मोक्याच्या ठिकाणी जागा देण्यात यावी, असे न्यायालयाने निकाल पत्रात म्हटले होते. तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निकाल दिला होता.
तीन वर्षांत उभारणार भव्य राममंदिर
राममंदिर भव्य असणार आहेच, त्याचबरोबर तीन मजली उभारण्यात येणार आहे. सीता रसोई येथेच सीता मंदिर उभारण्यात येणार आहे. राममंदिराच्या उभारणीसाठी तब्बल तीन ते साडेतीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. मंदिराचा लेआउट फायनल झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. राममंदिराच्या बांधकामासाठी अंदाजित खर्च 300 कोटी रुपये इतका असणार आहे. तर परिसरातील 20 एकर जागेचं सुशोभिकरण करण्यासाठी तब्बल एक हजार कोटी इतका खर्च असणार आहे.