पुणे -मॉडेलिंग क्षेत्रात कामाची संधी तसेच दररोज पाच ते सहा रुपये कमवा, अशी जाहिरातबाजी करून युवक-युवतींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपींनी 203 जणांकडून 43 लाख 93 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी एका युवतीने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर एका महिलेसह योगेश मदनलाल मुंदडा (दोघे रा. छत्रपती संभाजीनगर), जय पंकज चावजी, शुभम जयप्रकाश पगारे, अनिरुद्ध बिपीन रासने (रा. कोथरुड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.
…अशी झाली फसवणूक
मॉडेलिंग क्षेत्रात कामाची संधी असल्याचे आमिष दाखविणारी जाहिरात समाजमाध्यमातून प्रसारित करण्यात आली. रंगभूषाकार, केशरचना, छायाचित्रकारांना मॉडेलिंग क्षेत्रात कामाची संधी असल्याचे आमिष दाखविण्यात आले. दररोज, पाच ते सात हजार रुपये मिळतील, असा उल्लेख जाहिरातीत केला गेला. आमच्या कंपनीला काम मिळाले आहे. यासाठी कामासाठी इच्छुक असणाऱ्यांना तीन महिन्यांसाठी चार हजार 425 रुपये आणि दोन वर्षांसाठी 17 हजार रुपये भरावे (सबक्रीप्शन) लागतील, असे कामासाठी इच्छुकांना सांगण्यात आले. यासाठी युवक-युवतीचा समुह तयार करण्यात आला. सर्वांना द पुणे स्टुडिओ येथे बोलाविण्यात आले. 21 मार्चपासून काम सुरू होणार असे सांगण्यात आले. परंतु, कंपनी आर्थिक अडचणीत असून काम मिळाले नसल्याचे सांगण्यात आले.