पुणे- कोंढवा परिसरात दहशत निर्माण करून खुनाचा प्रयत्न, खंडणी उकळणे असे गुन्हे करणाऱ्या मंगेश माने व त्यांच्या टोळीतील इतर 5 जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली ही 62 वी मोक्का कारवाई आहे.
मंगेश अनिल माने (वय 26, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), लाडप्पा ऊर्फ अखिलेश ऊर्फ लाड्या चंद्रकांत कलशेट्टी (वय 20, रा. गोकुळनगर, कोंढवा बुद्रुक), सूरज अंकुश बोकडे (वय 22, रा. माऊलीनगर, कोंढवा), सागर कृष्णा जाधव (रा. सासवड व अप्पर बिबवेवाडी), प्रथमेश रमेश हनाळनंदे (रा. टिळेकरनगर, कोंढवा), प्रतीक रमेश हनाळनंदे (रा. टिळेकरनगर, कोंढवा) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
मंगेश माने व त्यांच्या टोळीवर कोंढवा पोलीस ठाण्यात शरीराविरुद्धचे 10 गुन्हे दाखल आहेत. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी सहायक आयुक्त राजेंद्र गलांडे व पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्यामार्फत मोक्का कारवाईचा प्रस्ताव अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी या प्रस्तावाची छाननी करून त्याला मंजुरी दिली. पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर तपास करत आहेत.