आंबेगाव बुद्रुक (प्रतिनिधी )- आंबेगाव बुद्रुक येथील कात्रज नऱ्हे रोडवर या पूर्वी रस्त्यावर जाणाऱ्या नागरिकांचे मोटारसायकली वरून मोबाईल हिसकावण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
सध्या कोरोना संसर्गामुळे गेली दोन महिने लॉक डाऊन असल्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे होत नव्हते. परंतु आत्ता चौथा लॉक डाऊन चालू असून बरेच गोष्टीत शिथिलता आल्यामुळे मोबाईल चोरीची टोळी सक्रिय झाली आहे.
दत्तनगर आंबेगाव रोड वरील विठ्ठल हेरिटेज समोर अनेक भाजीवाले झाडाच्या सावलीत अनधिकृतपणे भाजीविक्री करत आहेत .या ठिकाणी कोणतेही सोशल डिस्टनसिंग पाळले जात नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा घेऊन सलग दोन दिवसापासून मोबाईल चोरांनी पाच मोबाईल ची चोरी केली आहे.मोबाईल चोराकडून ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट केले जात आहे.
पुणे शहरात कोरोना संसर्ग दिवसेदिवस वाढत आहे. अशा वेळेस अनेक ठिकाणी रस्त्यावर भाजी विक्रेते बसून असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना न करता गर्दी केली जात आहे.त्यामुळे महानगरपालिकेने या गोष्टीकडे लक्ष देऊन अशा अनधिकृत भाजी विक्रेत्या वर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. तसेच पोलिस प्रशासनाने या भागात गस्त वाढवून सदर चोरावर कारवाई करण्याबाबत नागरिक मागणी करत आहेत.
मी या भागातील सहिवाशी असून आज माझ्या पत्नीसह भाजीपाला घेण्यासाठी दत्तनगर आंबेगाव रोडवर गेलो असता माझा व आणखी तीन नागरिकांचे मोबाईल चोरीला गेले. मी ऑनलाईन तक्रार केली आहे. परंतु पोलिस प्रशासनाने अशा चोरावर लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून फिरणे अवघड होईल.
सूर्यकांत नेवसे, ज्येष्ठ नागरिक, तक्रारदार