मोबाइल चोरटा पुढे अन्‌ पोलीस, नागरिक मागे

पुणे  – एका तरुणीचा मोबाइल हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला नागरिक तसेच पोलिसांनी पाठलाग करून पकडले. जिल्हा परिषदेसमोर ही घटना घडली.

रेहान ऊर्फ अकील इस्लामउद्दीन मलिक (वय 25, सध्या रा. नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मलिक मूळचा दिल्लीचा आहे. काही दिवसांपूर्वी तो शहरात आला होता. त्याने अशाप्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. फिर्यादी मोनिका गोसावी (वय 23, रा. धायरी) या मंगळवार पेठेतील एचडीएफसी बॅंकेत काम करतात. त्या गुरूवारी कामावर जाण्यासाठी पीएमपी बसने डॉ. आंबेडकर पुतळा येथे उतरल्या. तेथून नरपतगिरी चौकाच्या दिशेने मोबाइलवर बोलत चालल्या होत्या. यावेळी आरोपीने त्यांचा मोबाइल हिसकावून पळ काढला. यामुळे मोनिका यांनी घाबरून “चोर…चोर’ असा आरडा ओरडा केला.

दरम्यान, तेथे पेट्रोलिंग करणारे पोलीस कर्मचारी नीलेश साबळे, अनिल शिंदे यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्याकडून चोरलेला हॅन्डसेट हस्तगत करण्यात आला. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम व पोलीस निरीक्षक गुन्हे विनायक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस फौजदार ए. डी. रणपिसे, महिला पोलीस शिपाई सुरेखा शिंदे, पोलीस शिपाई अनिल शिंदे व पोलीस शिपाई नीलेश साबळे यांनी केले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)