नवी दिल्ली – मोबाइलचे डिस्प्ले आणि टच पॅनलच्या आयातीवरील शुल्क 10 टक्क्यांनी वाढविण्याची अंमलबजावणी 1 ऑक्टोबरपासून सुरू झाली असल्यामुळे मोबाइल फोन किमान 3 टक्क्यांनी महाग होण्याची शक्यता मोबाईल फोन उत्पादकांनी व्यक्त केली आहे.
इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक असोसिएशन या संघटनेने, यासंदर्भात जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, ही आयात शुल्क वाढविण्याची घोषणा 2016 मध्ये करण्यात आली होती. त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी 1 ऑक्टोबरपासून होणार असल्यामुळे आयात महागात पडेल. ही महाग उपकरणे वापरून तयार केलेले मोबाइल त्या प्रमाणात महाग होतील.
मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादने निर्मात्या संघटनेचे अध्यक्ष पंकज महिंद्र यांनी म्हटले आहे की, सध्या ही उपकरणे किंवा सुटे भाग पुरेशा प्रमाणात तयार करण्याची यंत्रणा भारतामध्ये विकसित झालेली नाही. मुळात केंद्र सरकारने हा निर्णय हे सुटे भाग देशात तयार करण्यासाठी घेतला होता. मात्र, भारतीय उत्पादकांची तयारी झालेले नाही. त्यातच लॉकडाऊनमुळे भारतीय उत्पादकांना तयारी करता आले नाही.
देशांतर्गत उत्पादनासाठी कंपन्या प्रयत्नशील
मात्र, भारतातील कंपन्या हे सुटे भाग भारतात तयार करण्याबाबत प्रयत्न करीत आहे. वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी 2016 मध्ये असे सुटे भाग तयार करण्यासाठी 68 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची घोषणा केली होती. मात्र या प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी मिळालेली नाही. ही मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.