मुंबईनंतर शहरातील नाट्यगृहांमध्ये जॅमर बसविण्याच्या हालचाली
पुणे – मुंबईमध्ये “जॅमर’बाबत घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर दि. 10 डिसेंबर रोजी दै. “प्रभात’मध्ये “पुण्याच्या नाट्यगृहांना जॅमर कधी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. नाटक सुरू होण्यापूर्वी मोबाइल “सायलेंट मोड’वर ठेवण्याचे किंवा “स्वीच्ड ऑफ’ ठेवण्याचे आवाहन केले जाते. मात्र, प्रेक्षक त्याच्याकडे कानाडोळा करतात. या प्रश्नावर येत्या काही महिन्यांमध्ये ठोस उपाययोजना होणार आहे.
महापालिकेची शहरात 14 नाट्यगृहे आहेत. त्यापैकी डेक्कन परिसरातील बालगंधर्व रंगमंदिर, कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि पद्मावती येथील आण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे होणाऱ्या नाटकांच्या प्रयोगांचे प्रमाण अधिक आहे. पहिल्या टप्प्यात या 3 नाट्यगृहांमध्ये जॅमर बसविण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मोबाइलमुळे सातत्याने येणाऱ्या व्यत्ययाच्या घटनांनंतर नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवावेत, अशी मागणी होती. त्यानुसार सांस्कृतिक विभागाकडून विद्युत विभागाला पत्र पाठविण्यात येणार आहे, असे सांस्कृतिक विभागाचे संतोष भोर यांनी सांगितले.
नाटकाच्या वेळामध्ये जॅमर बसविण्याच्या प्रस्तावाबाबत प्रशासन विचाराधीन आहे. याबाबत अद्याप पत्र पाठविले नाही. लवकरच याबाबत पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.
– सुनील मते, व्यवस्थापक