दहा शहरांत मोबाइल मेडिकल युनिट

पुणे – पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील दहा महापालिकांच्या हद्दीत प्रत्येकी दहा मोबाइल मेडिकल युनिट वितरित केले जाणार आहे. शहरातील आरोग्य केंद्रांपासून दूर असलेल्या मानवी वस्त्यांमधील नागरिकांना विनामूल्य वैद्यकीय उपचार मिळावेत. याकरिता हा उपक्रम राबविला जाणार आहे. वैद्यकीय सुविधांचे सक्षमीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे.

केंद्र सरकारच्या वतीने मानवी आरोग्य सुदृढ राहण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत शहरातील झोपडपट्टी भाग व आरोग्य केंद्रांपासून दूर असलेल्या नागरिकांना फिरत्या वाहनांतून प्राथमिक स्वरुपाचे वैद्यकीय उपचार विनामूल्य उपलब्ध करून देण्यासाठी उपक्रम राबविला जात आहे. केंद्र सरकारच्या वतीने गेल्यावर्षापासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. यंदाच्या मंजुर वार्षिक कृती अंमलबजावणी आराखड्यामध्ये राज्यातील दहा महापालिकांच्या कार्यक्षेत्रातदहा मोबाइल मेडिकल युनिट उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

ही योजना बाह्य पुरवठादाराच्या माध्यमातून पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याकरिता वाहन खरेदी व त्यामध्ये आवश्‍यक ती जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असणार आहे. यासर्व बाबींकरिता एक कोटी 20 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

या महापालिकांमध्ये मिळणार युनिट
पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, मीरा-भाईंदर व उल्हासनगर या महापालिकांमधील झोपडपट्टया व मानवी वस्तीपासून दूर अंतरावर असलेल्या मानवी वस्त्यांमध्ये मोबाइल मेडिकल युनिटस्‌ उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.