सणसर बाजारातून हातोहात मोबाइल लंपास

भवानीनगर  – सणसर (ता. इंदापूर) येथील आठवडे बाजारात भुरट्या चोरांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. या बाजारातून मोबाइल चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. महागड्या किमतीच्या मोबाइलची चोरी केली जात असून पॉकेटमारीही मोठ्या प्रमाणात होत असल्याने सर्वसामान्य शेतकरी, ग्राहकांचे हाल होत आहेत. इंदापूर तालुक्‍यातील सणसर गावांमध्ये दर रविवारी मोठा आठवडे बाजार भरतो.

बाजारात घरगुती सर्व वस्तूंपासून ते भाजीसह कडधान्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होतात. ग्रामपंचायतीच्या वतीने बाजारासाठी नियोजन केलेले आहे. गेली कित्येक वर्षे याठिकाणी हा बाजार भरत असल्याने परिसरातील दहा ते पंधरा गावातील लोक बाजारात खरेदीसाठी येतात. आठवडे बाजारात ग्राहकांची गर्दी होत असल्याने भुरटे चोरटे ग्राहकांचा खिसा रिकामा करीत आहेत. महागडे मोबाइल, पैशांचे पॉकेट हातोहात लंपास करीत आहेत. दर रविवारी बाजारात दोन-तीन मोबाइलची चोरी होत आहेत. याबाबत भवानीनगर दूरक्षेत्र पोलिसांनी बाजारातील भुरट्या चोरांकडे लक्ष दिले पाहिजे. पोलिसांनी भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक व ग्राहकांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.