मुंबई – आज मुंबईत स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळा व्हॅनचे लोकार्पण होत असले तरी भविष्यात ही सुविधा संपूर्ण राज्यात उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिली. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा नक्की लाभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एनएबीएल क्रीडेटेड आणि आयसीएमआरची मान्यता असलेल्या स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या करोना चाचणी प्रयोगशाळांचे लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, स्पाईस जेटचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग व मान्यवर उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, गतवर्षी करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला तेव्हा पुणे आणि मुंबईत कस्तुरबा येथे दोन ठिकाणीच करोना चाचणी प्रयोगशाळा कार्यरत होत्या. शासनाने काही दिवसांमध्ये ही संख्या 500वर नेली. “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानातून करोना बाधित रुग्णांचा शोध घेण्यात आला. संशियातांची तपासणी करताना सहव्याधीग्रस्तांचा शोधही घेण्यात आला.
करोनावर आता लस उपलब्ध झाली असली तरी विविध देशात करोनाचे नवे स्ट्रेन येताना दिसत आहेत. त्यावर संशोधनही सुरु आहे. त्यामुळे आजही करोना रुग्णांचा शोध घेऊन त्यावर उपचार करण्याला शासनाचे प्राधान्य आहे.
अशा गरजेच्यावेळी स्पाईस हेल्थने पुढे येऊन परवडणाऱ्या दरात करोना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. कमी वेळेत त्या चाचणीचा अहवालही मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा नक्की लाभ होईल. मुंबईत या तीन फिरत्या चाचणी प्रयोगशाळांच्या माध्यमातून करोना रुग्णांचा शोध घेण्याचा मोठा ड्राईव्ह हातात घेता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात करोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी रुग्णांचा शोध घेणे त्याच्या संपर्कात आलेल्यांच्या तपासणी करून घेणे याला आजही खूप महत्त्व आहे. त्यानंतच उपचार, क्वॉरंटाईन करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.