बीड : बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी सुदर्शन घुले याच्या मोबाईलमधील डाटा रिकव्हर झाला आहे. तसेच विष्णू साठे याच्या मोबाईलमधील महत्वाचा डेटा देखील सीआयडीने शोधला आहे, अशी माहिती अशी माहिती दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली आहे. केज येथील शासकीय विश्रामगृहावर CIDचे अधिकारी अनिल गुजर यांची भेट घेतली तेव्हा या तपासाच्या अनुषंगाने चर्चा झाली, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली.
आरोपी सुदर्शन घुले याच्या मोबाईलमधील डेटा हस्तगत करण्यात आला असून या डाटामधून काही महत्त्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता आहे. ज्यामुळे पुढील तपासाला मदत होईल. तपासात काही गोपनीयता पाळायच्या आहेत म्हणून ती माहिती दिली जात नाही. मात्र, तपास समाधानकारक सुरू आहे, असं मतही धनंजय देशमुख यांनी व्यक्त केलं आहे.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी ही धनंजय यांनी केली. पुढे बोलताना म्हणाले, संतोष देशमुख यांना न्याय देताना ज्या गोष्टी अडसर ठरत असतील त्यावर मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घ्यावी अशी विनंती धनंजय देशमुखांनी यावेळी केली.
सरपंच हत्याप्रकरणी कुणालाही सोडणार नाही : मुख्यमंत्री
जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच हत्याप्रकरणी कुणालाही सोडले जाणार नाही. राज्यात येथून पुढे अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. अन्वेषणात कुणीही आढळून आले, तरी त्याला सोडणार नाही; मात्र अन्वेषण यंत्रणा काम करत असतांना इतरांनी त्याविषयी वक्तव्य करू नये. जिल्ह्यातच नाही, तर राज्यातही अत्याचार खपवून घेतला जाणार नाही, तो कितीही मोठा असू दे, कायद्याच्या पुढे कुणी मोठा नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
कोण आहे सुदर्शन घुले?
सुदर्शन घुले बीडमधील केजचा टाकळी गावचा रहिवाशी आहे. सुदर्शन घुले 27 वर्षांचा असून इयत्ता सातवीपर्यंत त्याच शिक्षण झाले आहे. सध्या सुदर्शन हा ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा. तसेच उचल घेऊन कामाला न आलेल्या मजूरांकडून सुदर्शन वसुली देखील करायचा. सुदर्शनची राजकारणात देखील चांगली ओळख असल्याचे बोलले जात आहे.
सुदर्शनवर 10 वर्षांत 10 गुन्हे दाखल आहेत. तर कृष्णा आंधळेवर 4 वर्षांमध्ये 6 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. याचदरम्यान वाल्मिक कराड याचा खास असलेल्या विष्णू चाटे याच्यासोबत त्याची ओळख झाली. त्यातून त्याला काही कामं मिळाली. राजकीय नेते, पक्षाचे काम करणे, व्यवहार सांभाळणे अशा कामात तो तरबेज असल्याचे गावकरी सांगतात.