उत्तरप्रदेशात महाविद्यालये, विद्यापीठात मोबाईल बंदी

योगी आदित्यनाथ सरकारचा मोठा निर्णय

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये मोबाईल वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने या संदर्भातील निर्णय घेतला आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या आवारामध्ये मोबाईल बाळगणे आणि त्याचा वापर करण्यावर बंदी असेल. उत्तर प्रदेशमधील उच्च शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन आदेश काढले आहेत.

बंदीमुळे यापुढे विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या किंवा विद्यापीठाच्या आवारात मोबाईल घेऊन जाता येणार नाही. त्याचबरोबर प्राध्यापकांनाही शैक्षणिक आवारात मोबाईल वापरता येणार नाही. उत्तर प्रदेशमधील सर्व विद्यापीठांमध्ये हे आदेश लागू असणार आहेत. विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने आपले शिक्षण घेता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाविद्यालयाच्या वेळेत अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपला बहुमूल्य वेळ मोबाईल बघण्यात वाया घालवत असतात. ते टाळून त्यांनी आपल्या अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावे, यासाठी सरकारने हे आदेश काढले आहेत, असे सरकारी आदेशात म्हटले आहे. योगी आदित्यनाथ यांनी याआधीच मंत्रिमंडळ बैठक आणि इतर शासकीय कामकाजावेळी मोबाईल वापरण्यावर बंदी घातली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.