मनसेला आघाडीत घेणार नाहीच – अशोक चव्हाण

पुणे – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी आघाडी करताना या आघाडीत बहुजन वंचित आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला घ्यायची आमची तयारी आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रस्ताव दिला तरी कोणत्याही परिस्थितीत मनसेला या आघाडीत घेण्यास आमची मान्यता असणार नाही, असा स्पष्ट इशारा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिला. निवडणुकांनंतर आम्ही विरोधात बसायचे की सत्तेत याचा सर्वस्वी निर्णय हा जनताच घेणार आहे, त्यामुळे त्याबाबतीत भविष्य वर्तविण्याचा कोणताही अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाही, अशा कानपिचक्‍याही त्यांनी दिल्या.

कॉंग्रेसच्या वतीने आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या दरम्यान पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी हा इशारा दिला. आमदार शरद रणपिसे, माजी खासदार एकनाथ गायकवाड आदी याप्रसंगी उपस्थित होते. आगामी निवडणुकांसाठी पक्षाच्या वतीने जिंकण्याची क्षमता आणि लोकाभिमुख उमेदवारांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात येणार आहे, असे स्पष्ट करून चव्हाण म्हणाले, पुण्याची लोकसभेची जागा ही पहिल्यापासूनच कॉंग्रेसने लढवली आहे. त्यामुळे ही जागा अन्य कोणत्याही मित्र पक्षांना सोडण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही.

सध्याच्या दुष्काळाच्या परिस्थितीत चारा छावण्या सुरू करण्याची मागणी जनतेच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, या शासनाने डान्सबार आणि लावण्या सुरू केल्या आहेत, असा आरोप करून चव्हाण म्हणाले, हे सरकार गेल्या चार ते साडेचार वर्षांच्या कालावधीत सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. शेतमालाला भाव, शेतकऱ्यांची कर्जमाफी, किमान वेतन, रोजगार निर्मिती हे सर्व प्रश्‍न सोडविण्यात विद्यमान केंद्र आणि राज्य शासनाला साफ अपयश आले आहे. याउलट सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश आणि राज्यातील अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असून या सर्व प्रकारांना भाजप शासनच जबाबदार आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला.

गेल्या चार ते साडेचार वर्षांच्या कालावधीत एकही प्रश्‍न सोडविण्यासाठी अथवा विकासकामे करण्यासाठी शासन आणि भाजपच्या नेत्यांनी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. निवडणुकांच्या दरम्यान भाजपच्या नेत्यांनी दिलेली आश्‍वासने केवळ “चुनावी जुमले’ ठरले आहेत, त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये या सरकारला कोणत्याही परिस्थितीत सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.
– खासदार अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)