राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष
नव्या स्वरूपातील झेंड्याचे अनावरण होणार
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यव्यापी अधिवेशन आज होणार आहे. मुंबईच्या गोरेगाव येथील नेस्को संकुलात हे अधिवेशन पार पडणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सकाळी या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. या अधिवेशनात मनसेचा झेंडा नव्या स्वरूपात सादर केला जाणार आहे. तसेच या अधिवेशनात राज ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनाला सुमारे वीस हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दिवसभर चालणाऱ्या अधिवेशनात नगरविकास, कृषी, ग्रामीण विकास आदी सात ठराव मांडण्यात येणार असल्याचे मनसेच्या सूत्रांनी सांगितले. राज ठाकरे यांनी उद्घाटन केल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून दुपारी ठराव मांडण्यात येणार आहेत. त्यानंतर नव्या स्वरूपातील झेंड्याचे अनावरण केले जाणार असून राज यांच्या भाषणाने समारोप होणार आहे. मनसेच्या स्थापनेच्या वेळी मी महाराष्ट्राचा व महाराष्ट्र माझा असे सांगत राज यांनी मनसेच्या झेंड्याचे तीन रंग का आहेत हे स्पष्ट केले होते.
विकासाची भाषा करता करता मराठी पाट्यांचे आंदोलन, परप्रांतींयाविरोधातील आंदोलन तसेच अनधिकृत फेरीवाला, टोल आंदोलन 2006 पासून केली. तथापि गेल्या पाच वर्षांत राज्यात सर्वत्र मनसेची पडझड झाली. आता मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनात मनसेचा तिरंगी झेंडा बदलून मनसे भगवा झेंडा हाती घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.