औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन केले. औरंगाबादमध्ये मनसेने मंदिरे उघडण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. मात्र मनसेच्या मंदिर उघडण्याच्या मागणीवर शिवसेनेने बोचरी टीका केली आहे.
मनसेचे आंदोलन म्हणजे भाजपचा स्पॉन्सर कार्यक्रम आहे, अशी टीका शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांनी केली. मंदिरे उघडण्याची हिंमत मनसेत नाही, मनसेने नादी लागू नये, मनसेचे आंदोलन म्हणजे भाजपचा स्पॉन्सर कार्यक्रम आहे, असा हल्लाबोल चंद्रकांत खैरे यांनी केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज औरंगाबाद शहरात मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन करण्यात आले.
औरंगाबाद शहरातील गुलमंडीवर असलेल्या सुपारी हनुमान मंदिरासमोर हे आक्रमक आंदोलन करण्यात आले. यावेळी मंदिरासमोर जमलेल्या शेकडो मनसे कार्यकर्त्यांनी घंटानाद करत आंदोलन केले. आंदोलनादरम्यान पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना तब्यात घेतले.