मनसेचे स्थायी समिती सभागृहाबाहेर आंदोलन

पालिकेत घोषणाबाजी कचरा संकलन शुल्कास विरोध

पिंपरी  – पिंपरी-चिंचवड महापालिकेने घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी प्रत्येक घरातून दरमहा 60 रुपये शुल्क आकारणीस सुरुवात केली आहे. जुलै महिन्यापासून शुल्काची आकारणी केली जात आहे. या निर्णयाच्या विरोधात मनसेने आज (बुधवारी) महापालिकेत आंदोलन केले.

महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहाच्या समोर मनसेचे गटनेते सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. “”कचऱ्यावर पैसे घेणाऱ्या प्रशासनाचा धिक्‍कार असो, कचरा आकारणी शुल्क गोळा करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो”, “”महापौरांचे करायचे काय खाली डोके वर पाय, लुटारू आयुक्तांचे, सत्ताधाऱ्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय” अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.

रूपेश पाटेकर, विशाल मानकर, राजू सावळे, हेमंत डांगे, भोसरी विभागाध्यक्ष अंकुश तापकीर, महिला शहराध्यक्ष अश्‍विनी बांगर, अनिता पांचाळ, सीमा बेलापूरकर, नारायण पठारे, अक्षय कारंडे, देवेंद्र निकम, प्रदीप लांडे, बंटी कांबळे, सागर सोनटक्के, रवी जाधव, सूरज पाधर आदींनी आंदोलनात सहभाग घेतला होता.

सचिन चिखले म्हणाले की, स्वच्छता व आरोग्य उपविधी लागू करण्याबाबत शासनाने 11 जुलै 2019 रोजी अध्यादेश जारी केला आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी महासभेची स्वतंत्र मान्यता घेण्याची आवश्‍यकता नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार महासभेची मान्यता न घेता प्रति घर दरमहा 60 रुपये शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. शहरातील कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेने दोन ठेकेदार नेमले आहेत. आठ वर्षांसाठी ठेका देण्यात आला आहे. मात्र, मागील दोन महिन्यांपासून शहर “कचऱ्यात’ गेले आहे. दोन-दोन ठेकेदार नेमून शहराची ही अवस्था असताना शुल्काचा बोजा करदात्यांच्या माथी मारणे अन्यायकारक आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here