मुंबई : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून जोरदार निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला आता मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी रामदास आठवले यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले प्रकाश महाजन?
माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की आम्ही महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांना सोबत घेण्याचा विचार करू, आमचे हिंदुत्वाचे विचार एकत्र आहेत, रामदास आठवले साहेब तुमचा पूर्ण आदर बाळगून एवढंच सांगू इच्छितो, गोपीनाथ मुंडे यांनी तुम्हाला भाजपच्या झाडाच्या खाली आणले. तुम्ही त्या झाडावर चढला आणि आता भाजपच्या झाडाचे बांडगुळ आहात.
तुमच्यामुळे भाजपला काही फायदा होत नाही, पण भाजपमुळे तुम्ही अखंड मंत्री पदावर आहात ते तुम्ही लक्षात घ्यावं. दुसऱ्यावर टीका करताना आपण काचेच्या घरात आहोत, याचा त्यांनी विचार करावा. त्यांच्याविषयी पूर्ण आदर ठेवून मी हे बोलतो कारण त्यांनी माझ्या नेत्यावर आरोप केले आहेत. आठवले यांना फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही असा हल्लाबोल प्रकाश महाजन यांनी आठवले यांच्यावर केला आहे.
काय म्हणाले होते रामदास आठवले?
राज ठाकरे यांची या निवडणुकीत हवा गेली. त्यांना वाटायचे माझ्याशिवाय सत्ता येणार नाही, त्यांचे स्वप्न भंग झाले. राज ठाकरे यांना महायुतीत घेण्याचा फायदा नाही, मी असताना त्यांची काय गरज आहे, असे रामदास आठवले म्हणाले होते.