पुणे – भाजप आणि शिवसेनेची पहिली यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये काही विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली. तर काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. पुण्यातील कोथरूडमधून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या ठिकाणच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता मात्र कापण्यात आला. त्यानंतर मेधा कुलकर्णी या नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या.
मात्र, आपण नाराज नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्याला चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट मेधा कुलकर्णी यांनी केला आहे.
दरम्यान, कोथरूड भागात दूरचा नको घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे. आम्ही कोथरूडकर, अशा आशयाची पोस्टरबाजी करण्यात आल्याची पहायला मिळाली होती. कोथरूडमधून भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याने ही फलकबाजी करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
त्यानंतर मंगळवारी भाजपाच्या पहिल्या यादीत चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांनी मी नाराज नसल्याचे सांगितले आहे. पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.