मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जोरदार राजकीय हालचाली सुरु आहेत. अश्यातच, (शिवसेना) उद्धव ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे या जोरदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्या भाजपा, शिंदे गट आणि मनसेवर आपल्या कडक शब्दांत प्रहार करत असून, आपल्यावर केलेल्या प्रत्येक टीकेला सडेतोड उत्तर देत आहेत.
यावर आता मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आहे. महाजन यांनी सुषमा अंधारे यांचा एकेरी उल्लेखही केला आहे. सुषमा अंधारे काहीही बोलते. तिच्या मेंदूला काय नारू झालाय का? असा संतप्त सवाल महाजन यांनी केला आहे.
सुषमा अंधारेंची सभा कालच झाली. या बाईला काय बोलावं? मी बीड जिल्ह्यातील आहे. तीही बीड जिल्ह्यातील आहे. तिला बोलायला ठेवलंय, भुंकायला नाही. मेंदूला नारू झाला की काय तिच्या. काय बोलली ती?असा सवाल प्रकाश महाजन यांनी केला आहे.