वाईट प्रवृत्ती रोखण्यासाठी लांडेंना विजयी करणार – चिखले

निगडीत पदयात्रा, सर्वपक्षीय सहभागी

पिंपरी – भोसरी मतदारसंघात बदलाचे वारे वाहत आहेत. अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना सर्वपक्षियांचा शंभर टक्के पाठिंबा मिळाला आहे. लांडे यांना संपूर्ण मतदारसंघात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जनतेनेच ही निवडणूक आपल्या हाती घेतली आहे. कोण कुठला पैलवान, एकदा विश्‍वास ठेवला म्हणून मतदारसंघ विकत घेतल्यासारखा कारभार सुरू आहे. ही लोकशाही आहे, लोकच मालक असतात. मतदारसंघातील जनतेने पाच वर्षे खूप सोसले, सहन केले. कथित पैलवानाला निवडणुकीत जनतेची ताकद दिसेल.

निगडीचा संपूर्ण परिसर हा विलास लांडे यांना विजयी करण्यासाठी कटिबद्ध आहे. मतदारसंघात वाईट प्रवृत्ती वाढू द्यायची नसल्यामुळे या भागातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी विलास लांडे यांच्या पाठिशी उभे आहेत, असे प्रतिपादन मनसेचे शहराध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले यांनी मंगळवारी (दि. 15) केले. भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी मंगळवारी निगडीतील यमुनानगर, साईनाथनगर, निगडी गावठाण या भागात पदयात्रा काढून प्रचार केला. या पदयात्रेत सर्वपक्षीय सहभागी झाले.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मनसेसह भाजप आणि शिवसेनेतील नाराजांनीही पदयात्रेत सहभागी होऊन लांडे यांना पाठिंबा दिला. लांडे यांनी या सर्वांचे आभार मानत आपला विजय निश्‍चित असल्याचा विश्‍वास व्यक्‍त केला. निगडीतील नागरिकांनीही लांडे यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. चौकाचौकात महिलांनी लांडे यांचे औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. लांडे यांनी नागरिकांशी संवाद साधला. मतदारसंघात चुकीच्या प्रवृत्तींना वाढू देऊ नका. आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी या प्रवृत्ती घातक आहेत. त्यांना मतदारसंघातून हद्दपार करण्यासाठी कपबशी चिन्हावर मतदान करा, असे आवाहन लांडे यांनी केले.

निगडी गावठाणातील मारूती मंदिरात दर्शन घेऊन लांडे यांनी पदयात्रेला सुरूवात केली. लक्ष्मीनगर, दत्त मंदिर, सुवर्णयुग साईमंदिर, अमृता मठ, जेटीबी चौक, महादेव मंदिर, रत्ना हॉस्पिटल परिसर, शिवभुमी, श्रीनिवास हॉस्पिटल परिसर, इंदिरानगर, राजनगर, पवळे हायस्कूल, अंजुमन सोसायटी, आझाद चौक, पीसीएमसी वासहत नवी व जुनी बिल्डिंग, साईनाथनगर, यमुनानगर, दत्त मंदिर परिसरात ही पदयात्रा काढण्यात आली. त्यामध्ये स्थायी समितीच्या माजी सभापती सुमन पवळे, माजी नगरसेवक शशिकिरण गवळी, बीआरएसपीचे शहराध्यक्ष संजीवन कांबळे, बाळासाहेब वेदळेकर, राष्ट्रवादी महिला आघाडी शहराध्यक्षा व नगरसेविका वैशाली काळभोर यांच्यासह मनसे, राष्ट्रवादी आणि बीआरएसपीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले, विलास लांडे हे बहुजनांचे उमेदवार आहेत. भोसरी मतदारसंघातील सर्वपक्षियांचा त्यांना पाठिंबा आहे. “भाजप आणि शिवसेनेनेही ये अंदर की बात है, हम विलास लांडे के साथ है’ म्हणून काम सुरू केले आहे. जनतेचाही विलास लांडे यांनाच उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. यमुनानगर आणि परिसरातील जनतासुद्धा लांडे यांच्याच पाठिशी आहे.

मतदारसंघातील जनतेने पाच वर्षांपूर्वी विश्‍वास ठेवलेल्या कथित पैलवानाने गोरगरीब आणि मागासवर्गीय लोकांसाठी काहीच काम केले नाही. या जनतेला पाच वर्षात साधे विचारले देखील नाही. गेल्या पाच वर्षात मतदारसंघात एक तरी प्रकल्प केल्याचे या कथित पैलवानाने नागरिकांना सांगावे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काळात झालेल्या कामांचेच हे श्रेय घेत आहेत. गतिमान सरकार आणि व्हिजन 20-20 म्हणून मतदारसंघातील जनतेला मूर्खात काढण्याचे काम केले गेले. जनतेला आता कथित पैलवानाचे सर्व डावपेच समजले आहेत. मतदारसंघावर पाच वर्षे दहशत पसरवणाऱ्या या कथित पैलवानाला जनतेने घरी बसविण्याचा निश्‍चय पक्का केला आहे.

जनतेची ही सुप्त भावना समजल्यामुळे कथित पैलवानाने मोठ मोठी गाजरे दाखविण्यास सुरूवात केली आहे. रोज एकाच्या तोंडून पाच वर्षात हे केले, ते केले, एवढे रोजगार मिळणार आहेत, कामगारांचे भले झाले आहे, असे खोटनाटे पसरवले जात आहे. मतदारसंघात काम झाले असते, लोकांना रोजगार मिळाला असता, तर सोशल मीडियावर असे खोटोनाटे पसरवण्याचा उद्योग करण्याची वेळ कथित पैलवानावर आली नसती. पण या निमित्ताने पैलवानाने आपण किती खोटे बालतो, याचे उदाहरण जनतेसमोर ठेवले आहे.

ही जनता दुधखुळी राहिलेली नाही, हे या निवडणुकीत दिसेल. विलास लांडे दहा वर्षे आमदार होते. मात्र त्यांच्या काळात मतदारसंघात आतासारखी परिस्थिती नव्हती. आता मतदारसंघाला पुन्हा विलास लांडे यांच्याच नेतृत्वाची गरज आहे. त्यासाठी मतदारसंघातील सर्व जनता एकवटली आहे. ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली आहे. त्यामुळे भोसरी मतदारसंघात कपबशीचा विजय पक्का असल्याचे तानाजी खाडे
यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.