अकोला : काही दिवसांपूर्वी अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालोकर याचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. मात्र आता त्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. यामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. जय मालोकर याचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने नाही तर मारहाणीमुळे झाल्याचे या रिपोर्टमधून समोर आले आहे.
काय आहे रिपोर्टमध्ये?
मनसे कार्यकर्ता जय मालोकर याच्या मृत्यू प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. जय मालोकर याचा पोस्टमार्टम रिपोर्ट आता समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये जय मालोकर याचा मृत्यू जबर मारहाणीमुळे झाल्याचा म्हटलं आहे. जय मालोकरच्या पाठीवर, छातीवर, डोक्यावर आणि मानेवर जबर मारहाण झाल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.तसेज मारहाण इतकी भयानक करण्यात आली होती की, जय मालोकर याच्या छातीच्या चार ते पाच बरगड्या मागच्या बाजूने फ्रॅक्चर होत्या. तसेच डोक्याला देखील गंभीर मारहाण झाली आहे. पोस्टमार्टमवेळी जयच्या मेंदूला सूज होती, त्यामुळे त्याच्या मेंदूचं वजन वाढलं. मानेवर जबर मारहाणीमुळे त्याच्या मज्जातंतूंना गंभीर इजा झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. या घटनेमुळे न्युरोजेनिक शॉकमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये म्हंटल आहे.
काय घडले होते नेमके?
अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहाबाहेर 30 जुलैला मनसे कार्यकर्ते आणि अमोल मिटकरी यांच्यात जोरदार राडा झाला होता. मनसे कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींची गाडी फोडली होती. यानंतर गुन्हा दाखल झालेल्या वीस कार्यकर्त्यांपैकी जय मालोकारचा मृत्यू हृदयविकारानं झाल्याचा दावा करण्यात आला होता. जय हा मनसेच्या विद्यार्थी सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष होता. तो परभणी येथे होमिओपॅथी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाला होता. मिटकरींसोबत झालेल्या राड्याच्या ताणातूनच जयचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला होता.