मुंबई – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील आमदार भारत भालके यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या जागेसाठी अनेक नेत्यांकडून फिल्डींग लावण्यात आली होती. एवढच काय अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार या जागेवरून निवडणूक लढविणार अशी चर्चा सुरू होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पंढरपूरमधून उमेवारी निश्चित केली आहे.
पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना काही वेळापूर्वीच भाजपकडून समाधान महादेव आवताडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीने देखील उमेदवारी निश्चित केली असून राष्ट्रवादीकडून दिवंगत भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांना पाठिंबा देऊ केला आहे. मनसेचे राज्य सचिव दिलीप धोत्रे यांनी ही माहिती वृत्त माध्यमांशी बोलतांना दिली. मनसेने राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त पाठिंबाच जाहीर केलेला नाही. तर मनसेचे नेते मतदारसंघात फिरून भगीरथ भालके यांचा प्रचारही करणार आहेत.
दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून १७ एप्रिलला मतदान होणार आहे. तर २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी २३ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून ३० मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर ३ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.