मनसेने झेंडा नाही, तर मन बदलावे : ना. आठवले

संगमनेर – मनसेने झेंडा बदलल्याने काहीही होणार नाही. त्यापेक्षा त्यांनी मन बदलावे, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला.

संगमनेर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, मनसेच्या सभेला गर्दी होते. पण त्यांना मते मिळत नाही. आता त्यांनी पक्षाचा झेंडा बदलला आहे. त्याने काहीही फरक पडणार नाही. मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे, असे आठवले म्हणाले.

तसेच भाजपने राज्यात मनसेशी युती करू नये. तसे झाल्यास भाजपला मोठी किंमत मोजावी लागेल, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्ज माफी दिली. परंतु त्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचा शब्द पाळावा, अशी मागणीही आठवले यांनी केली.

यावेळी आठवले यांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला (एनसीआर) पाठिंबा दिला. हा कायदा समजून घेणे गरजेचे आहे. यात सहा धर्मांचे लोक आहे. त्यांना नागरिकत्व देण्याचा कायदा आहे. देशात जे मुस्लिम आहेत, त्यांच्या नागरिकत्वावर कोणतीही गदा येणार नाही.

मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे त्याचा फायदा घेण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस त्यांना विरोध करत आहे. जम्मू-कश्‍मिर येथील 370 कलम हटविले आहे. ते निर्णय चांगला आहे. तेथील विकास करता येणार आहे. पाकव्याप्त कश्‍मिर येथे जे आतंकवादी घुसखोर आहेत, त्यांना जरब बसविता येणार आहे. आतंकवाद थांबवयचे असेल, तर पाकव्याप्त कश्‍मिर ताब्यात घ्यावा लागणार आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणात चौकशी झालीच पाहिजे. मंत्री अनिल देशमुख यांनी घोषणा केली. त्यांना अधिकार आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी जो बंद पुकारला होता. त्यात रिपाइंचे कार्यकर्ते अग्रभागी होते. म्हणून तो बंद यशस्वी झाला. समाजाच्या हितासाठी आम्ही एक आहोत, असेही आठवले यावेळी म्हणाले.

स्मारकाचा निधी रुग्णालयाला देण्यास विरोध
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा निधी वाडिया हॉस्पिटलला देण्याच्या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेल्या भूमिकेला आठवले यांनी यावेळी विरोध केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे पैसे रुग्णालयाला देण्यास आमचा विरोध आहे. रुग्णालयासाठी सरकारने निधी द्यावा. ते बंद पडता कामा नये. पण इंदू मिलमधील स्मारकही पूर्ण झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.