पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील घसरता आलेख थांबविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणुकीच्या तोंडावर प्रयत्न सुरू केले असून, पदाधिकारी निवडीची जाग या पक्षाला आली आहे. पदाधिकाऱ्यांची निवड केली असली तरी पक्षाचा जनाधारच घटलेला असताना गट-तटांमध्ये अडकेला हा पक्ष विधानसभेला सामोरे जाणार की नाही अद्यापपर्यंत तळ्यात-मळ्यातच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पिंपरी-चिंचवड शहर मनसेच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये शहरातील 75 पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या नियुक्त्या जाहीर केल्यामुळे पक्षामध्ये चैतन्य आणण्याचा प्रयत्न केला असला तरी गटबाजीमुळे मेळाव्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. ठराविक लोकांच्या हातीच पक्षसंघटना असल्याची चर्चा सध्या शहरात रंगली आहे.
या मेळव्याला शहराध्यक्ष सचिन चिखले, हेमंत डांगे, रुपेश पटेकर, अश्विनी बांगर, राजू भालेराव, बाळा दानवले, राजू सावळे, विशाल मानकरी, अंकुश तापकीर, मयुर चिंचवडे, दत्ता देवतरासे, राहुल जाधव, सुशांत साळवी, विष्णु चावरियॉं या प्रमुखांनी हजेरी लावली असली तरी बहुतांश पदाधिकारी गैरहजर होते.
महापालिकेत या पक्षाच्या नगरसेवकांची संख्या एकवर पोहोचली आहे. तर विधानसभेला अपेक्षित प्रतिसाद गेल्या दोन निवडणुकांमध्ये मिळाला नाही. यावेळी निवडणूक लढवायची की नाही? याबाबत प्रदेशपातळीवरच निश्चित नसल्यामुळे सध्या असलेले पदाधिकारीही अनभिज्ञ आहेत. घटलेला जनाधार, पक्षीय पातळीवर नसलेली एकसूत्रता आणि गटबाजीमुळे मनसेने विधानसभेला कशा पद्धतीने सामोरे जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मनसेतर्फे 75 जणांच्या नियुक्त्या –
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात 75 कार्यकर्त्यांनी विविध पदे देण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा निहाय प्रभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष आणि उपविभाग अध्यक्ष यांना नियुक्ती पत्र दिले आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आवश्यक मोर्चेबांधणीचा भाग म्हणून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तीनही मतदारसंघामध्ये मनसेतर्फे उमेदवार देण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. मनसेकडून चिंचवड मतदारसंघातून राजू सावळे, हेमंत डांगे, भोसरी मतदारसंघातून सचिन चिखले, अंकुश तापकीर, तर पिंपरी मतदारसंघातून के. के. कांबळे, राजू भालेराव हे प्रमुख इच्छुक आहेत.