मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. खरं तर ही विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी अटीतटीची झाली. मात्र, या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. तसेच या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही मोठा धक्का बसला आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एक आमदार निवडून आला होता. मात्र, या २०२४ च्या निवडणुकीत मनसेला साध खातेही खोलता आलेले नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल १२८ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. एवढंच नाही तर विधानसभेच्या प्रचारात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचा गद्दार असा उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केला होता.
महाविकास आघाडी आणि महायुतीवरही जोरदार टीका केली होती. तसेच कोणत्याही परिस्थिती मनसे सत्तेत बसेल म्हणजे बसेल, असे विधान देखील राज ठाकरे यांनी केले होते. तसेच महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात द्या, असे आवाहनही राज ठाकरे यांनी जनतेला केले होते. मात्र, राज ठाकरे यांचे हे आवाहन जनतेने धुडकावून लावले.
दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीत मनसेचा एकही आमदार निवडून न आल्यामुळे मनसेचे ‘इंजिन’ रुळावरून घसरल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. तसेच राज ठाकरेंना जनतेने का नाकारले? याबाबत आता राजकीय वर्तुळात अनेकजण वेगवेगळे प्रश्न आणि मत व्यक्त केली जात आहेत.