कोंढवा – नव्याने समाविष्ठ झालेल्या गावांमुळे टुमदार पुणे शहराने जणू आक्राळ विक्राळ रुपच धारण केले आहे. या गावांचा व शहराचा विकास साधायचा असेल तर मनसेला सत्ता द्या कारण मी भूमीपूजन केलेल्या जागेतील शाळेच्या इमारतीचे उदघाटन मीच करतोय याचा आनंद होतोय. दिलेला शब्द मनसे नगरसेवक पाळतात याच उत्तम उदाहरण साईनाथ बाबर आहेत. असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
कोंढवा खुर्द येथे महापालिकेच्या माध्यमातून व नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या स्वर्गीय राजेंद्र बाळासाहेब लोणकर ई – लर्निग स्कूलचे उदघाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ठाकरे बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक साईनाथ बाबर, माजी नगरसेविका आरती साईनाथ बाबर यांनी केले होते.
यावेळी मनसे नेते अनिल शिदोरे, शहराध्यक्ष वसंत मोरे, बाबू वागस्कर, बाळासाहेब कामठे, अमोल शिरस, सुप्रिया सतिश शिंदे, शेखर लोणकर, हुसेनभाई शेख, रोहन गायकवाड, सतिश शिंदे, महेश लोणकर आदींसह परिसरातील नागरिक मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. लोकांना पाच वर्षापुर्वी दिलेला शब्द पाळला असून, विकासात्मक कामांना गती दिली आहे.
आगामी काळात देखिल कोंढव्यातील विविध विकासकामे आपल्या मार्गदर्शनाखाली केली जातील असा विश्वास यावेळी नगरसेवक साईनाथ बाबर यांनी व्यक्त केला.