मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुलगा अमित ठाकरेसाठी भांडुपऐवजी माहीम मतदारसंघ का निवडला याचा खुलासा केला आहे. तसेच अमित ठाकरेंना निवडणुकीत का उतरवण्यात आले? याचादेखील खुलासा त्यांनी केला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
अमित ठाकरेंना भांडुप मतदारसंघातून तिकीट देण्याची मागणी होत असतानाही माहीम मतदारसंघातून उमेदवारी का देण्यात आली? याचा खुलासा करताना राज ठाकरे म्हणाले “माझी बैठक सुरु होती. त्यात एक दोनजण आपण अमितला भांडुपमधून उभं करु असं सांगत होते. त्यावेळी माझे अँटिना उभे राहिले, हे काहीतरी गंभीर प्रकऱण दिसत आहे असं लक्षात आलं. याचं कारण मी ज्या विचारात वाढलो तिथे निवडणुका लढवणं असं काही नाही. जर माझ्या मुलाच्या डोक्यात तसं येत असेल तर हे प्रकरण काय आहे असा विचार सुरु झाला.
मी आणि शर्मिला त्याच्यासोबत बसलो. मला लोक सांगत आहेत की तुला भांडुपमधून उभं करा, तुला खरंच निवडणूक लढवायची आहे का? असं विचारलं. त्यावर त्याने तू जर सांगत असशील तर मी तयार आहे असं तो म्हणाला. त्यावर मी तू मानसिकरित्या तयार आहेस का? असं विचारलं, त्याला निवडणूक लढणं फार सोपी गोष्ट नसते हेदेखील सांगितलं”.
“मी म्हटलं इथे तीन-चार पक्ष येतील त्यातून निवडणूक लढशील. त्यावर तो हो म्हणाला. मी त्याच्याबरोबर एकही बैठकीत थांबलो नव्हतो. माझ्या तीन, चार बैठकी झाल्या होत्या. तो खरंच तयार आहे का हे जाणून घ्यायचं होतं. नंतर हा तयार आहे असं लक्षात आलं. मग जर त्याला उभं करायचं आहे तर जिथे तो जन्मला, वाढला, आसापासचा परिसर माहिती आहे, लोक माहिती आहेत, जागा माहिती आहे अशा ठिकाणी उभं राहावं असा विचार आला,” असा खुलासा राज ठाकरेंनी केला.