मुंबई – महाराषट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रकृती अस्वस्थामुळे काही काळासाठी त्यांचा नियोजीत अयोध्या दौरा स्थगित केला आहे. ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्यानंतर याबाबत राजकीय वर्तुळातून उलटसूलट चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर, विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत टोला लगावताना म्हणाले राज ठाकरेंनी जर अयोध्या दौऱ्याबाबत आमची मदत मागितली असती तर नक्कीच आम्ही केली असती. यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राऊतांवर पलटवार केला आहे.
बाळा नांदगावकर प्रत्युत्तर देत म्हणाले की, हो.. तुमच्याकडूनच काय ती सुरक्षा घेणे, तेवढेच बाकी राहिले आहे. त्याची काही आम्हाला आवश्यकता नाही. आम्ही अयोध्या दौरा पुन्हा जाहीर केला की, संजय राऊत यांनाही सांगू. संजय राऊत तुम्ही आमच्यासोबत अयोध्येला चला. तुम्ही आलात म्हणजे आम्हाला सगळी सुरक्षा येईल. एकटेच संजय राऊत पुरेसे होतील, असा खोचक टोला लगावत, महाभारतात संजय होता ना, ते नुसते समोर असले तरी खूप झाले. सुरक्षा आपोआप मिळेल. त्यांना वाईट वाटायची गरज नाही. असा पलटवार नांदगावकर यांनी केला आहे.
दरम्यान, राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार होते. प्रकृती अस्वस्थामुळे राज ठाकरेंचा दौरा काही काळासाठी स्थगित करण्यात आल आहे. यासंदर्भात खुद्द राज ठाकरे यांनी ट्विट करून माहिती दिली असून ते पुण्यातील सभेत यावर सविस्तर भाष्य करणार असल्याचेही म्हणाले आहेत.