मुंबई – मराठी माणसासाठी आणि मराठी चित्रपटांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नेहमीच आक्रमक पवित्र घेतला आहे. मनसेने अनेकदा मराठी चित्रपटांना शोज मिळावेत यासाठी आंदोलने केली आहेत. नुकतेच तीन मराठी दर्जेदार चित्रपट प्रदर्शित झाले त्यापाठोपाठ हिंदीतील बिग बजेट लाल सिंग चड्डा आणि रक्षाबंधन हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला. यामुळे अचानक मराठी चित्रपटाचे शोज कमी करण्यात आल्याचा आरोप मनसेच्यावतीने करण्यात आला आहे.
मराठी चित्रपटाचे शोज कमी केल्याचा आरोप करत मनसे नेते अमेय खोपकर यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. ज्याठिकाणी मराठी चित्रपटांना हाऊसफुल्ल गर्दी मिळते तिथूनही हद्दपार करण्यात आलंय. तुमचे हिंदी सिनेमे जरुर चालवा पण त्यासाठी मराठीचा बळी का? असा सवाल खोपकर यांनी उपस्थित केला आहे. त्यासोबतच मोठा वीकेंड आहे म्हणून बॉलीवूडप्रमाणे मराठी चित्रपटांनाही कमाई करायची आहे असे ट्विट खोपकर यांनी केले आहे.
गेल्या दोन आठवड्यात प्रदर्शित झालेल्या टाईमपास ३, दे धक्का २ आणि एकदा काय झालं या मराठी चित्रपटांचे शोज अचानक कमी झालेले आहेत. लालसिंग चढ्ढा आणि रक्षाबंधन या हिंदी चित्रपटांच्या आक्रमणामुळे हे शोज कमी करण्यात आले आहेत असे स्पष्ट मत अमेय खोपकर यांनी ट्विट करत व्यक्त केले आहे.
ज्याठिकाणी मराठी चित्रपटांना हाऊसफुल्ल गर्दी मिळते तिथूनही हद्दपार करण्यात आलंय. तुमचे हिंदी सिनेमे जरुर चालवा पण त्यासाठी मराठीचा बळी का?
मोठा वीकेंड आहे म्हणून बॉलीवूडप्रमाणे मराठी चित्रपटांनाही कमाई करायची आहे.— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) August 12, 2022
जी मुजोरी हिंदीवाल्यांनी चालवली आहे ती त्वरित थांबली पाहिजे आणि मराठीला हक्काचे शोज परत मिळालेच पाहिजे असे देखील खोपकर आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.