जुनी सांगवी ‘कचऱ्यात’

मनसेकडून आंदोलनाचा इशारा

याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष राजू सावळे यांनी ह प्रभाग अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, कचरा उचलण्याची मागणी केली आहे. अन्यथा ह प्रभाग व पिंपरी-चिंचवड मुख्य कार्यालयासमोर कचऱ्याच्या भरलेल्या गाड्या खाली करून “मनसे स्टाईल’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सुरेश सकट,सतीश मटपरती, दिलीप ठोंबरे, प्रदीप गायकवाड आदी उपस्थित होते. 

सांगवी – जुनी सांगवी परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून घंटागाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याने सर्वत्र कचऱ्याचे ढिग दिसू लागले आहेत. कचरा कुंड्यातील भाज्या, अन्न पदार्थ खाण्यासाठी मोकाट जनावरे ठाण मांडून बसली असल्याने कचरा अस्ताव्यस्त झाला आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. सांगवी, पिंपळे गुरव परिसर भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचा बालेकिल्ला समजला जातो. असे असतानाही येथील कचऱ्याचे व्यवस्थापन होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

शहराच्या उत्तर भागाचे कचरा वहन व संकलनाचे कंत्राट बीव्हीजी कंपनीला 21 कोटी 6 लाख आणि शहराच्या दक्षिण भागाचे काम ए. जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्‍टस्‌ला 22 कोटी 12 लाख असा ठराव करून देण्यात आले आहे. 28 फेब्रुवारी रोजी महापालिकेने दोन्ही कंपन्यांसोबत करार केला. त्यानुसार 90 दिवसांच्या आत या कंपन्यांनी कामाला सुरुवात करणे अपेक्षित होते. 1 जूनपासून काम सुरू करणे गरजेचे असतानाही या कंपन्यांनी एक महिना उशिरा म्हणजे 1 जुलैपासून कचरा उचलण्याचे काम सुरू केले. मात्र, नियोजनाशिवाय काम सुरू केल्याने आणि कॉम्पॅक्‍टर बंद पडल्याने कचरा गोळा झाला नाही.

परिणामी सांगवी परिसरासह काळेवाडी, थेरगाव आदी उपनगरातील कचराकुंड्या “ओव्हर फ्लो’ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील नागरिकांचा करापोटी गोळा गेलेला पैसा आरोग्याच्या दृष्टीने शहरातील कचरा उचलण्यासाठी अंदाजे 43 कोटी 18 लाख असा खर्च होणार आहे. परंतु, कंत्राट दिलेल्या कंपन्यांच्या ठेकेदारांची यंत्रणा तुटपुंजी असल्यामुळे त्यांची धांदल उडाली आहे. जुनी सांगवीत घंटागाड्याच आल्या नसल्याने नाईलाजास्तव नागरिकांनी घरातील कचरा कचराकुंड्यांमध्ये टाकल्यामुळे कचराकुंड्या ओसंडून वाहत आहेत. आजूबाजूच्या परिसरातील जनावरांनी तो कचरा अस्ताव्यस्त केल्याने कचराकुंड्यातील कचरा रस्त्यावर पसरला आहे. त्यामुळे नागरिकांना व वाहनांना तेथून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. तसेच दोन दिवस पाऊस पडत असल्यामुळे कचऱ्यात पाणी साचून त्याची दुर्गंधी सगळीकडे पसरली आहे. त्यामुळे जवळपास राहणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

या परिसरात 17 घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा उचलण्याचे काम केले जात होते. मात्र, दोन्ही कंपन्यांनी जास्त क्षमतेच्या नवीन पाच घंटागाड्या समाविष्ट करून कचरा उचलण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, या घंटागाड्या अपुऱ्या पडत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या आधी प्रत्येक गाडीत दोन कामगार कचरा घेण्यासाठी उभे असायचे. आता मात्र एकाच कामगाराला हा कचरा घेण्याचे काम करावे लागत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून काम संपेपर्यंत म्हणजे जास्तवेळ काम करावे लागणार असल्याने या कामगारांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.