पुणेः आमदार तानाजी सावंत यांच्या पुत्राच्या अपहरण नाट्यावर अखेर पडद्या पडला आहे. सुरूवातीला आमदाराच्या पुत्राचे अपहरण झाल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर स्वतः तानाजी सावंत यांनी पोलीस ठाणे गाठत अपहरणाची तक्रार दाखल केली होती. पण मुलानेच आपण पुण्याहून बँकॅाकला जात असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. त्यानंतर पुणे सह आयुक्त रंजनकुमार शर्मा आणि आमदार तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत याविषयी माहिती दिली. सावंतांनी मुलाचे अपहरण झाले नसून तो न सांगता घरातून निघून गेला असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यानंतर अपहरण प्रकरणावर पडदा पडला.
पत्रकार परिषदेत शर्मा यांनी ऋषिकेश यांना परत कसे आणले याबद्दल माहिती दिली. ज्या खाजगी विमानात आमदार पुत्र ऋषिकेश आणि त्याचे दोन मित्र बँकॅाकच्या दिशेने रवाना झाले, त्याची किंमत लाखांच्या घरात आहे. यामुळे याविषयी अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आता या प्रकरणात ऋषिकेश सावंत बँकॅाकला नेमकं कशासाठी गेले होते, याची माहिती खुद्द ऋषिकेश यांनी पोलिसांना जबाबात दिली आहे.
मित्र अनभिज्ञ
बिझनेस ट्रिपसाठी ऋषिराज सावंत हे आपल्या दोन मित्रांसमवेत बँकॅाकला जात होते, अशी कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे. तसेच ऋषिराज यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या दोन्ही मित्रांचा जबाबही पोलिसांनी नोंदवून घेतला आहे. प्रवीण प्रदीप उपाध्याय आणि संदीप श्रीपती वसेकर यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले घेतले आहेत. तब्बल ७८ लाख ५० हजार रुपये देऊन ऋषिराज सावंत हे त्यांच्या २ मित्रांना घेऊन बँकॅाकच्या दिशेने निघाले होते. याबाबत ऋषिराज यांनी घरी सांगितले नसल्याची माहिती मित्रांना नव्हती, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. यातील एक मित्र सावंत यांच्या एका संस्थेत कार्यरत आहे.
गिरीराज सावंतांची प्रतिक्रिया
या प्रकरणावर ऋषिराज यांचे बंधू गिरीराज यांनी माध्यमांना प्रतक्रिया दिली होती. जेव्हा लहान भाऊ ऋषिराज सावंत याच्याशी संपर्क होत नव्हता, तेव्हा तो कुठे निघून गेला हे कळत नव्हतं म्हणून वडिल तनाजी सावंत प्रचंड अस्वस्थ झाले होते, त्यानंतरच आम्ही सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री (नागरी उड्डाण) मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेनंतर तातडीने सुत्रे हालवून ऋषिराज यांचे चार्टर प्लेन चैन्नईहून माघारी फिरले असल्याची माहिती त्यांनी दिली.
नाना पटोलेंचा आरोप
या अपहरण नाट्य प्रकरणावरून विरोधकांनी तानाजी सावंतांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. हे सरकार सातत्याने सत्तेचा दुरुपयोग करत आहे, हा गुंडाराज सरकारने पोसलेला आहे. त्याला संरक्षण देण्याचे काम मंत्रालयातून आणि डीजी ऑफिसमधून सुरू असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. त्यांनी सावंत यांच्या मुलाच्या अपहरण नाट्यावर आपली प्रतिक्रिया दिली.
हे प्रश्न अनुउत्तरितच
आमदार तानाजी सावंत यांनी मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. मुलाचा शोध घेण्यासाठी सरकारी यंत्रणेला विठेस धरले, असा आरोप केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणावर काही प्रश्न निर्माण होतात….
मोबाइलवर संपर्क होत नव्हता, तर थेट अपहरणाची तक्रार का दिली? ऋषिराज बँकॉकला जाणार आहेत, हे कुटुंबीयांना नेमके कधी माहीत झाले? तपासासाठी पोलीस यंत्रणेवर काही दबाव आला का? खासगी विमान हवेतून माघारी वळविण्याएवढी ही घटना खरेच गंभीर होती का? सामान्य माणसाला त्याच्या आपत्कालीन स्थितीतही यंत्रणांचे असे सहकार्य मिळेल का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत.