महापालिकेच्या खर्चावर आमदारांची “उड्डाणे’?

वायू सेनेची भरती ः महापालिका करणार 31 लाखांचा खर्च

“हे’ आमदारांना शोभत नाही – दत्ता साने
दरम्यान, महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनीही भरती प्रक्रियेच्या प्रसिद्धीवरुन आमदार महेश लांडगे यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात दत्ता साने यांनी म्हटले आहे की, हवाई दलाच्या भरतीचा कार्यक्रम राष्ट्रहिताचा असल्यामुळे महापालिकेने हा खर्च करण्यास हरकत नाही. परंतु, या कार्यक्रमाची प्रसिद्धी भोसरीचे आमदार घेत आहेत. तशा आशयाच्या जाहिराती फ्लेक्‍ससह इतर समाज माध्यमांवर फिरत आहेत.

पिंपरी – हवाई दलाच्या वतीने शहरात भरती अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 31 लाखांचा खर्च करण्यास महापालिकेच्या स्थायी समितीने आयत्यावेळी मंजुरी दिली. एकीकडे हवाई दलाच्या भरतीवर महापालिका खर्च करीत असताना दुसरीकडे आमदार महेशदादा लांडगे स्पोर्टस्‌ फाउंडेशनच्या माध्यमातून ही भरती होत असल्याची दवंडी समाज माध्यमांवर पसरविण्यात येत असल्याने करदाते बुचकळ्यात पडले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेच्या खर्चातून आमदारांची प्रसिद्धीची उड्डाणे सुरू असल्याची चर्चा भोसरी विधानसभा मतदार संघात रंगली आहे. तर विरोधी पक्षनेत्यांनीही आमदारांवर टीकेची झोड उठविली आहे.

जेमतेम दोन महिने उरल्याने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. एक ना अनेक फंडे राबवून मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे त्यामध्ये आघाडीवर आहेत. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी “इव्हेंट’चा सपाटा लावला आहे. मागील काही दिवसांपासून हवाई दलाच्या भरतीची शहरात चर्चा आहे. 21 ते 29 जुलै या कालावधीत भोसरी येथे हे भरती अभियान होत आहे. राज्यातील 27 जिल्ह्यांसाठी गरुड कमांडोज या पदासाठी ही भरती होत आहे. आमदार महेश लांडगे स्पोटस्‌ फाउंडेशनच्या माध्यमातून ही भरती होत असल्याचे समाजमाध्यमांमधून प्रसारित करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर फ्लेक्‍सबाजीही करण्यात आली आहे. त्यावर आमदार लांडगे यांच्यासह त्यांच्या समर्थक नगरसेवकांची छायाचित्रे आहेत.

एवढेच नव्हे तर आमदार महेश लांडगे यांनी पत्रकार परिषद घेत भरती कार्यक्रमाची माहिती दिली. त्यात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तसेच प्रसिद्धी पत्रकानुसार या भरती प्रक्रियेसाठीच्या सुविधा महेश लांडगे स्पोर्टस्‌ फाउंडेशनकडून पुरविल्या जाणार असल्याचा दावा त्यांनी केला. यानंतर स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांनीही पत्रकार परिषद घेत राष्ट्रहितासाठी महापालिकेची मदत म्हणून स्थायी समितीने सुमारे 31 लाख रुपये खर्चास मंजुरी दिल्याची माहिती त्यांनी दिली. वास्तविकता भारतीय वायुसेना प्रशासन सिव्हीलमध्ये सहभागी होवून भरती प्रक्रिया राबविते त्यावेळी त्यासाठी आवश्‍यक इन्फ्रास्ट्रक्‍चर उपलब्ध करुन द्यावे लागते. हा खर्च महापालिका उचलणार असताना आमदारांची त्यावर “उड्डाणे’ कशासाठी असा सवाल करदाते करीत आहेत.

आमदारांना एवढीच जर मिरविण्याची हौस असेल तर त्यांनी हा खर्च वैयक्तीकरित्या करावा. परंतु, राष्ट्रहितासारख्या कार्यक्रमात महापालिकेच्या खर्चावर स्वत:ची पोळी भाजून घेणे आमदारांना शोभत नसल्याचे साने यांनी म्हटले आहे. भरतीच्या ठिकाणी दर्शनी भागावर हा कार्यक्रम महापालिकेच्या आर्थिक सहाय्यातून होत असल्याच्या आशयासह महापालिकेचे त्यावर बोधचिन्ह वापरावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हवाई दलाच्या भरती अभियानाच्या मंडप व्यवस्थेसाठी महापालिका स्थायी समितीने 22 लाख 49 हजार 856 रुपये आणि ध्वनी व प्रकाश व्यवस्थेसाठी 8 लाख 47 हजार 428 रुपये खर्चाला मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे आयत्यावेळी हा खर्च मंजूर करण्यात आला. आमदार महेश लांडगे समर्थक स्थायी समिती सदस्य राजेंद्र लांडगे यांनी हा प्रस्ताव मांडला. तर त्यांचेच दुसरे समर्थक संतोष लोंढे यांनी त्यास अनुमोदन दिले. त्यानंतर स्थायी समितीत खर्चाला मंजुरी देण्यात आली.लांडगे समर्थकांनीच मांडला खर्चाचा प्रस्ताव

शहरातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी महापालिकेने या भरतीसाठी खर्च मंजूर केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने हवाई दल व महापालिका हे अभियान घेत आहे. मंडप, बैठक व्यवस्था, ध्वनी व प्रकाश योजना महापालिका उपलब्ध करुन देणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव महापालिकेने मंजूर केला आहे.

– विलास मडिगेरी, सभापती महापालिका स्थायी समिती.

हवाई दल व आमदार महेश लांडगे स्पोर्टस्‌ फाउंडेशनच्या माध्यमातून राष्ट्रहितासाठी हा कार्यक्रम घेतला जात आहे. महापालिकेने त्यासाठी मदत देऊ केली आहे. आमचे फाउंडेशन देखील खर्चाचा भार उचलणार आहे. राष्ट्रहिताच्या कार्यक्रमात कोणीही मोडता घालण्याचा प्रयत्न करु नये.

– महेश लांडगे, आमदार. 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)