आमदारांनी सातारा-जावळी विकासापासून वंचित ठेवला

दीपक पवार, श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारार्थ कुडाळमध्ये झंझावाती पदयात्रा

सातारा – गेली कित्येक वर्षे सत्तेत असतानाही आमदारांनी जावळी तालुका विकासापासून वंचित ठेवला आहे. त्यामुळेच जावली तालुक्‍यातील जनता त्रस्त आहे. भूमिपुत्र असलेल्या दीपक पवार यांच्या रूपाने या तालुक्‍याला उमदे आणि दूरदृष्टीचे नेतृत्व मिळाले आहे, असे प्रतिपादन दादासाहेब रासकर यांनी केले. इतके वर्षे सत्तेत राहिल्याने शिवेंद्रराजेंना जनतेचा विसर पडल्याचा आरोपही त्यांनी केला असून आता सातारा-जावळी मतदारसंघात परिवर्तन अटळ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सातारा लोकसभेचे राष्ट्रवादी व मित्रपक्षाचे उमेदवार श्रीनिवास पाटील व सातारा-जावली विधानसभेचे महाआघाडी मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपक पवार यांच्या प्रचारार्थ कुडाळ येथे काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेत दादासाहेब रासकर नागरिकांशी बोलत होते. यावेळी दीपक पवार, संजय शिंदे, गणपतराव कुंभार, सुधीर पवार, सौरभ शिंदे, राजेंद्र लावंघरे, मोहनराव शिंदे, सुभाष गुजर प्रमोद शिंदे, बाळासाहेब पवार, दत्तात्रय साळुंखे, अशोक साळुंखे, दत्ता रासकर, प्रकाश निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

दादासाहेब रासकर म्हणाले, जावली तालुक्‍यातील मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यासाठी दीपक पवारांनी नेहमीच प्रयत्न केला आहे. इतके वर्षे स्वत:च्या घरात आमदारकी असून देखील आमदारांनी केवळ जनतेचा विश्‍वासघातच केला. जेव्हा लोक तुम्हाला निवडून देतात, त्यावेळी त्यांच्याही काही अपेक्षा असतात, त्यांची पूर्तता करणे हे लोकप्रतिनिधीचे काम असते. परंतु आमदारांनी जनतेला केवळ आणि केवळ झुलवण्याचेच काम केले.

जावली तालुक्‍यात अनेक कामे प्रलंबित आहेत, त्यामुळे जनतेत प्रचंड नाराजी आहे. सातारा-जावली मतदारसंघात अनेक कामे सरकारच्या व विविध माध्यमातून दीपक पवारांनी मार्गी लावली आहे. या भागाला भूमिपुत्र दीपक पवार यांच्या रूपाने उमदे नेतृत्व मिळाले असून जावळीचा विकास करण्यात दीपक पवार कुठेही कमी पडणार नाहीत. बापूंनी कधी पदासाठी, सत्तेसाठी काम केले नाही. जनतेचा विकास हेच ध्येय ठेऊन काम केले, असेही दादासाहेब रासकर म्हणाले.

सातारा-जावळी मतदारसंघात जनतेला झुलवण्याचे काम सुरू होते. आम्ही जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेऊन प्रत्येक गावात अनेक कामे मार्गी लावली. श्रीनिवास पाटील यांना खासदार आणि मला आमदार करून तुमची सेवा करण्याची संधी द्या, असे आवाहन दीपक पवार यांनी यावेळी केले. दरम्यान, कुडाळ गावात जोरदार शक्तिप्रदर्शन करत पदयात्रा काढण्यात आली. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह युवक-युवती, महिला, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)